संरक्षणमत्री राजनाथ सिंग मंगोलिया व जपानच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मंगोलिया व जपानच्या दौऱ्यावर चालले आहेत. दोन्ही देशांबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य वाढविणे हा त्यांच्या या दौऱ्याचा हेतू मानला जातो. हे दोन्ही देश भौगोलिक व सामरिकदृष्ट्या चीनसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे विश्लेषकांची नजर लागलेली आहे. संरक्षणमंत्र्यांच्या या जपान भेटीत दोन्ही देशांमधील ‘टू प्लस टू’ चर्चा संपन्न होईल. तैवानच्या आखातात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा लक्षणीय बाब ठरते.

सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आपल्या या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मंगोलियामध्ये दाखल होतील. 7 सप्टेंबर रोजी इथला दौरा पूर्ण करून संरक्षणमंत्री जपानला भेट देणार आहेत. 8 ते 9 सप्टेंबरमध्ये संरक्षणमंत्री जपानमध्ये असतील. याच काळात दोन्ही देशांमध्ये ‘टू प्लस टू’ अर्थात उभय देशांचे संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा होईल. या दौऱ्यामध्ये भारताचे मंगोलिया व जपानबरोबरील संरक्षणविषयक तसेच धोरणात्मक सहकार्य वाढविण्यासाठी राजनाथ सिंग प्रयत्न करणार आहेत.

भारताबरोबरील टू प्लस टू चर्चेच्या आधी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी पुढच्या पाच वर्षात भारतात सुमारे पाच लिियन येन (तीन लाख, वीस हजार कोटी रुपये) इतक्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यावेळी होणाऱ्या टू प्लस टू चर्चेतही जपान भारताबरोबरील आर्थिक तसेच लष्करी पातळीवरील सहकार्य विकसित करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या तैवानच्या आखातात चीनच्या आक्रमक कारवायांमुळे परिस्थिती चिंताजनक बनली असून यामुळे जपानला चीनपासून संभवणारा धोका देखील वाढला आहे. अशा परिस्थितीत भारताची जपानबरोबरील चर्चा सामरिकदृष्ट्या खूपच महत्त्वाची ठरते.

leave a reply