दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री तीन दिवसांच्या भारतभेटीवर

नवी दिल्ली – दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सुह वूक तीन दिवसांचा भारत दौरा सुरू होत आहे. भारत व दक्षिण कोरियामधील संरक्षणविषयक सहकार्य अधिकच दृढ व व्यापक करण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व संरक्षणमंत्री सुह वूक यांच्या चर्चेत दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार अपेक्षित आहेत. यामध्ये सागरी सुरूंग निकामी करणारे ‘माईन स्वीपर’ जहाज दक्षिण कोरियाकडून भाडेतत्त्वावर घेण्याच्या कराराचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भारताचा नैसर्गिक प्रभाव असलेल्या सागरी क्षेत्रात चीनचे नौदल करीत असलेल्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर, भारत व दक्षिण कोरियामधील हे सहकार्य महत्त्वाचे ठरते.

गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात भारताचे लष्करप्रमुख जनरल नरवणे दक्षिण कोरियाच्या भेटीवर गेले होते. यावेळी त्यांनी दक्षिण व उत्तर कोरियाची विभागणी करणार्‍या सीमेचीही पाहणी केली होती. त्यांची ही भेट विशेष गाजली आणि त्यातून भारताचे दक्षिण कोरियाबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य अधिकच व्यापक बनल्याचा संदेश मिळाला होता. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारतीय नौदलाच्या कारवायांना सहकार्य व आवश्यक ते सहाय्य पुरविण्यासंदर्भातील करार जनरल नरवणे यांच्या या दक्षिण कोरिया भेटीत झाला होता. त्याच्या आधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दक्षिण कोरियाला भेट दिली होती. अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान असलेल्या देशांमध्ये दक्षिण कोरियाचा समावेश आहे. त्यामुळे या देशाबरोबरील भारताचे संरक्षणविषयक सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

याआधी दक्षिण कोरियाने भारताला ‘के९ वज्र’ ही हॉवित्झर तोफ तयार करण्याचे तंत्रज्ञान पुरविले होते. त्याचा वापर करून भारताच्या लार्सन अँड टुब्रो कंपनीने १०० ‘के९ वज्र’ तोफा तयार केल्या होत्या. हा करार नव्याने होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी सागरी पृष्ठभाग तसेच तळावर पेरलेले सुरुंग निकामी करणारे माईन स्वीपर जहाज दक्षिण कोरियाकडून भाडेतत्त्वावर घेण्यासाठी भारत उत्सुक असल्याचे सांगितले जाते. संरक्षणमंत्री सुह वूक यांच्या या दौर्‍यात त्यावर निर्णय अपेक्षित आहे. चीनबरोबर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते.

हिंदी महासागर व त्या पलिकडच्या क्षेत्रात चीन विशेष स्वारस्य दाखवित आहे. भारताला याच क्षेत्रात घेरण्याचा चीनचा प्रयत्न असून त्यासाठी चीनच्या नौदलाने या क्षेत्रातील आपला वावर योजनाबद्धरित्या वाढविला आहे. यामुळे भारताच्या हितसंबंधांना फार मोठा धोका संभवतो. म्हणूनच देशाच्या नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून या आघाडीवर भारत दक्षिण कोरियाचे सहकार्य घेत आहे. भारत या देशाकडून भाडेतत्त्वावर घेण्यासाठी उत्सुक असलेल्या माईन स्वीपरबाबतच्या कराराचे महत्त्व म्हणूनच वाढल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply