अमेरिका-चीन राजनैतिक संघर्ष भडकला

- चेंगदूमधील अमेरिकी दूतावास बंद करण्याचे चीनचे संकेत

बीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिकेने ह्युस्टन दूतावास बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर चीनकडूनही त्याविरोधात जशास तसे कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. चीनच्या चेंगदू शहरातील अमेरिकेचा दूतावास बंद करण्यात येईल, असे वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्याचवेळी अमेरिकेत कार्यरत असणाऱ्या चिनी संशोधिकेने खोटी माहिती दिल्याचा आरोप ठेवण्यात आला असून तिला सॅनफ्रान्सिस्कोमधील चिनी दूतावासाने आश्रय दिल्याचा दावा अमेरिकी तपासयंत्रणांनी केला आहे. एकामागोमाग घडलेल्या या घटनांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व चीनमध्ये सुरू झालेल्या संघर्षाचे रूपांतर राजनैतिक युद्धात होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

America-chinaअमेरिकेची बौद्धिक संपदा व खाजगी माहिती यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चीनला ह्युस्टनमधील वाणिज्य दूतावास तीन दिवसात बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी दिली होती. अमेरिकेने अधिकृत घोषणा करण्यापूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून दूतावास बंद करण्याबाबत देण्यात आलेल्या एकतर्फी आदेशाचा निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात सदर आदेश राजकीय चिथावणीचा प्रयत्न असल्याचे सांगून त्याला प्रत्युत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर चिनी प्रसारमाध्यमांनी अमेरिकेचा चेंगदू शहरातील दूतावास बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त दिले. या वृत्ताला चीनकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी चेंगदू किंवा वुहान शहरातील अमेरिकेचा दूतावास बंद होऊ शकतो, असा दावा सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.

चीनच्या नैऋत्य भागात असणाऱ्या सिच्युआन प्रांतात चेंगदू शहर असून अमेरिकेने १९८५ साली इथे दूतावास सुरू केला होता. तिबेट व झिंजिआंगमधील घडामोडींची माहिती ठेवणारा हा दूतावास धोरणात्मकदृष्ट्या अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आठ वर्षांपूर्वी चीनमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी वँग लिजून यांनी, अचानक दिलेल्या भेटीमुळे हा दूतावास चर्चेत आला होता. चिनी प्रसारमाध्यमांमध्ये या दूतावासाच्‍या बंदीची चर्चा सुरू असली, तरी दूतावासाचे प्रमुख कॉन्सुल जनरल जिम मुलीनॅक्स यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर, चीनच्या अमेरिकेतील दूतावासाने अमेरिकेवर टीकास्त्र सोडले आहे. ‘चीन-अमेरिका संबंधांची तुलना एखाद्या गाडी बरोबर करायची झाली तर अमेरिका ही गाडी चुकीच्या मार्गावर नेत आहे, असे म्हणता येईल. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे अमेरिकेने गाडीचा वेग वाढविणाऱ्या पॅडलवर पाय ठेवला आहे. आता खरेतर गाडीला ब्रेक लावून ती योग्य दिशेने नेण्याची वेळ आली आहे’, असा टोला चीनने लगावला आहे.

America-chinaचीनकडून सुरू असलेल्या या हालचालींच्या पार्श्वभूमीवरच अमेरिकेने चीनविरोधात नव्या कारवाईचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात काम करणारी चिनी संशोधिका जुआन तांगवर खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अमेरिकी तपास यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात ‘एफबीआय’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली. जुआन तांग चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीची सदस्य असून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’त काम केले आहे. मात्र अमेरिकेचा व्हिसा मिळविताना तिने ही माहिती दडविल्याची बाब उघड झाली आहे.

गेल्या महिन्यात एफबीआयने यासंदर्भात तिची चौकशीही केली होती. मात्र त्यानंतर आपली अटक टाळण्यासाठी जुआन तांगने सॅन फ्रान्सिस्कोमधील चीनच्या दूतावासात आश्रय घेतल्याचे मानले जाते. जुआन अद्यापही चीनच्या दूतावासातच असून, दूतावास यासंदर्भातील खरी माहिती देण्याचे टाळत असल्याचा आरोप एफबीआयने केला आहे. या आरोपामुळे, अमेरिकेतील चीनचा अजून एक दूतावास वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे. त्याचवेळी अमेरिकेकडून गेली काही वर्षे चीनवर होणाऱ्या हेरगिरीच्या आरोपांनाही बळ मिळाले आहे.

leave a reply