जगातील आघाडीच्या पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांना मंदीचा धोका

- वित्तसंस्था व अर्थतज्ज्ञांचा इशारा

अर्थव्यवस्थांना मंदीचा धोकावॉशिंग्टन – जगातील आघाडीच्या पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांना मंदीचा धोका असल्याचा इशारा वित्तसंस्था व अर्थतज्ज्ञांकडून देण्यात आला. आघाडीची पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज्‌‍’च्या अधिकाऱ्यांनी मंदीकडे लक्ष वेधताना युरोपातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या ब्रिटन, जर्मनी व इटलीसह अमेरिकेला निश्चितपणे फटका बसणार असल्याचे बजावले. तर अमेरिकेतील आघाडीचे अर्थतज्ज्ञ असणाऱ्या नुरिअल रुबिनी यांनी 2023 सालातील आर्थिक संकट म्हणजे ‘ग्रेट स्टॅग्फ्लेशनरी डेब्ट् क्रायसिस’ असेल, याची जाणीव करून दिली.

चीनमध्ये 2019 साली आलेल्या कोरोनाच्या साथीनंतर 2020 साली जगातील अनेक अर्थव्यवस्थांना मंदीला तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर 2021 साली जागतिक अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र गेल्या वर्षी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर सर्व आर्थिक समीकरणे कोलमडल्याचे दिसत आहे.

युद्धामुळे इंधनाचे दर कडाडले असून जागतिक पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. बहुतांश देशांमध्ये महागाईचा भडका उडाला असून सामान्य जनतेला ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ला तोंड द्यावे लागत आहे. महागाई कमी करण्यासाठी जगातील सर्वच मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ करण्याचे धोरण राबविले आहे. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असून अनेक क्षेत्रातील मागणी घटल्याचे समोर आले आहे.

अमेरिका व युरोपिय देशांसह अनेक आघाडीच्या अर्थव्यवस्थांना या सर्वांचा मोठा फटका बसला आहे. ‘जी7’ या आघाडीच्या अर्थव्यवस्थांचा समावेश असलेल्या गटात अमेरिकेचा अपवाद वगळता बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्थांचे विकासदर घसरल्याची माहिती समोर आली आहे. यात ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, कॅनडा व जपानचा समावेश आहे. 2022 सालच्या अखेरच्या तिमाहीत जर्मनी, इटली, फ्रान्स व कॅनडाच्या विकासदरात घसरण झाली आहे. तर ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे दावे अर्थतज्ज्ञ व विश्लेषक करीत आहेत. अमेरिकेने गेल्या वर्षी विकासदरात वाढ नोंदविली असली तरी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेची अर्थव्यवस्थाही मंदीला सामोरी जाईल, असे फिच रेटिंग्ज्‌‍चे वरिष्ठ अधिकारी जेम्स मॅक्करमॅक यांनी बजावले.

जर्मनी व इटलीसारख्या आघाडीच्या युरोपिय अर्थव्यवस्थांमध्ये महागाई दरांमध्ये पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याकडेही मॅक्करमॅक यांनी लक्ष वेधले. ब्रिटनसह जर्मनी व इटली या युरोपातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असल्याने या देशांमधील पडझडीचे पडसाद युरोपातील इतर देशांमध्येही उमटण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जाहीर केलेल्या अहवालात महागाईची सर्वाधिक झळ युरोप खंडाला बसेल, असे बजावण्यात आले होते. जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व वर्ल्ड बँकेसारख्या प्रमुख अर्थसंस्थांनीही जागतिक मंदीच्या धोक्याकडे लक्ष वेधले होते. जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक तृतियांश भागाला यावर्षी आर्थिक मंदीचा फटका बसेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तालिना जॉर्जिव्हा यांनी दिला होता.

leave a reply