अमेरिकेच्या दबावानंतरही रशिया-युएई सहकार्यात विक्रमी वाढ

-रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा

अबू धाबी – युक्रेनविरोधात युद्ध पुकारणाऱ्या आणि पाश्चिमात्य देशांना आव्हान देणाऱ्या रशियाबरोबर युएईने कोणत्याही प्रकारचे सहकार्य प्रस्थापित करू नये, यासाठी अमेरिकेने दबाव टाकला होता. मात्र या दडपणाची पर्वा न करता युएईने वर्षभरात रशियाबरोबरील व्यापारी सहकार्यात आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. युएईच्या भेटीवर असलेले रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतूरोव्ह यांनी हा दावा केला.

संयुक्त अरब अमिरात-युएईची राजधानी अबू धाबी येथे सोमवारपासून ‘इंटरनॅशनल डिफेन्स एक्झिबिशन अँड कॉन्फरन्स’ अर्थात आखातातील सर्वात मोठे शस्त्रप्रदर्शन सुरू आहे. या निमित्ताने रशियाने आपल्या अतिप्रगत शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मांडले आहे. युक्रेनमधील युद्धात वापरलेल्या शस्त्रास्त्रांचाही यात समावेश असल्याचा दावा केला जातो. रशियाच्या दालनाला अरब देशांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी होत असल्याचा दावा रशियन माध्यमे करीत आहेत.

येत्या काही दिवसात रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर अबू धाबी येथील शस्त्रप्रदर्शनात रशियन शस्त्रास्त्रांचे दालन लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत. यानिमित्ताने रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांतूरोव्ह देखील युएईत दाखल झाले आहेत. युक्रेनबरोबरचे युद्ध सुरू असताना रशिया व युएईमध्ये प्रस्थापित झालेल्या सहकार्याचे महत्त्व उपपंतप्रधान मांतूरोव्ह यांनी अधोरेखित केले. गेल्या वर्षभरात पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादलेले असतानाही रशिया-युएईमधील व्यापारी उलाढाल नऊ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचे मांतूरोव्ह म्हणाले. रशियाबरोबर सहकार्य प्रस्थापित करणाऱ्या अरब देशांमध्ये युएई पहिल्या स्थानावर असल्याचे उपपंतप्रधान मांतूरोव्ह यांनी जाहीर केले.

दरम्यान, कठोर निर्बंध लादून रशियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न अमेरिका व युरोपिय मित्रदेशांनी केला होता. पण युएईसह इतर अरब देशांनी रशियाबरोबरचे सहकार्य वाढवून पाश्चिमात्य देशांचे प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा केला जातो.

leave a reply