विक्रमी महागाईमुळे अमेरिकी जनतेच्या बचतीला कात्री

-राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधातील नाराजी अधिकच वाढली

inflationवॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांमुळे भडकलेल्या अभूतपूर्व महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य अमेरिकी जनतेला बसत असल्याचे समोर येत आहे. गेल्या सहा महिन्यात अमेरिकी नागरिकांना आपल्या आपत्कालिन बचतीतील (रेनी डे सेव्हिंग्ज्‌‍) तब्बल 114 अब्ज डॉलर्सची रक्कम खर्च करावी लागल्याचे उघड झाले. त्याचवेळी दर महिन्याला वाढणाऱ्या महागाईमुळे अमेरिकी नागरिक महिन्याअखेरीस मिळकतीच्या जेमतेम पाच टक्के इतकीच बचत करु शकतो, अशी माहिती ‘फेडरल रिझर्व्ह’च्या अहवालात देण्यात आली. गेल्याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, आपल्या काळात अमेरिकी कुटुंबांची बचत वाढली असून कर्ज कमी झाले आहे, असा दावा केला होता.

US-Inflationमे महिन्यात अमेरिकेतील महागाई निर्देशांक 8.6 टक्क्यांवर पोहोचल्याची नोंद झाली. अमेरिकेच्या इतिहासात ही 1981 सालानंतरची सर्वाधिक वाढ ठरली आहे. इंधन, घरांच्या किंमती, ऊर्जा, कपडे, अन्नधान्ये, भाज्या यासह सर्वच जीवनावश्यक उत्पादनांच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाली. इंधनाचे दर तब्बल 50 टक्क्यांनी उसळले असून वीजेच्या बिलांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक भर पडली आहे. घरांच्या किंमतीत 20 टक्क्यांहून अधिक तर घरभाड्यात चार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली.

यामागे रशिया-युक्रेन युद्धाबरोबरच बायडेन प्रशासनाची चुकीची धोरणे कारणीभूत ठरल्याचे उघड झाले आहे. बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर सातत्याने अमेरिकेतील महागाई वाढत आहे. बायडेन प्रशासनाने इंधनक्षेत्रासह अंतर्गत खर्च व इतर योजनांबाबत घेतलेले चुकीचे निर्णय महागाईसाठी जबाबदार धरले आहेत. मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह प्रशासन ही गोष्ट स्वीकारण्यासच तयार नाही.

Inflation-USकाही महिन्यांपूर्वी अर्थमंत्री जॅनेट येलेन तसेच फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी महागाई तात्पुरती असल्याची वक्तव्ये केली होती. पण आता त्यांना या वक्तव्यावरून माघार घेणे भाग पडले असून महागाईचा अंदाज घेण्यात आपली चूक झाल्याची कबुली संबंधित अधिकारी तसेच मंत्र्यांनी दिली आहे. ही कबुली समोर आली असली तरी त्यामुळे अमेरिकी जनतेला बसणारी महागाईची झळ कमी झालेली नाही. उलट सामान्य जनतेला आपल्या बचतीतील मोठा निधी खर्ची करणे भाग पडले आहे.

डिसेंबर 2021च्या माहितीनुसार, अमेरिकी जनतेची बचत 2.7 ट्रिलियन डॉलर्स होती. मात्र मे महिन्याच्या अखेरीस त्यात जवळपास 100 अब्ज डॉलर्सहून अधिक घट झाल्याचे दिसून आले. ‘फेडरल रिझर्व्ह इकॉनॉमिक डाटा’ने दिलेल्या माहितीनुसार, महागाईला तोंड देण्यासाठी अमेरिकी जनतेला आपल्या राखीव बचतीतील 114 अब्ज डॉलर्स खर्च करणे भाग पडले. त्याचवेळी क्रेडिक कार्ड डेब्ट्मध्येही वाढ झाली असून हे प्रमाण 1.103 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. अमेरिकी नागरिकांच्या बचत खात्यात असणारी सरासरी रक्कमदेखील नऊ हजार डॉलर्सने घटल्याची माहिती वित्तसंस्थांनी दिली.

बायडेन प्रशासनाच्या धोरणांमुळे बसणाऱ्या फटक्यांमुळे अमेरिकी जनतेतील नाराजीही वाढू लागली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणात 88 टक्के मतदारांनी देश चुकीच्या मार्गावर चालल्याचे म्हटले आहे. तर 54 टक्के मतदारांनी अमेरिकी मध्यमवर्गाला बायडेन यांच्या धोरणाचा काडीचाही फायदा झाला नसल्याची टीका केली.

leave a reply