चीनसह इतर देशांनी दिलेले ५१ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याची श्रीलंकेची घोषणा

- ‘आयएमएफ’कडून बेलआऊटची अपेक्षा

५१ अब्ज डॉलर्सचे कर्जकोलंबो – भयंकर आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेने मंगळवारी आपल्या देशावर असलेली बाह्यकर्जे फेडण्यास असमर्थ असल्याचे घोषित केले. श्रीलंकेवर सुमारे ५१ अब्ज डॉलर्सचे कर्ज असून सध्याच्या स्थितीत या कर्जाची परतफेड थांबवावी लागणार असल्याचे श्रीलंकन सरकारने म्हटले आहे. आर्थिक संकटात असताना श्रीलंकेने सध्या नव्या कर्जासाठी विविध देशांकडे मागणी केली आहे. मात्र या निर्णयामुळे त्यांना आता नवी कर्जे मिळण्यास अडथळे येऊ शकतात, असे दावे केले जात आहे. मात्र श्रीलंकेला ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’चे (आयएमएफ) बेलआऊट मिळण्याची अपेक्षा आहे.

श्रीलंकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिक डबघाईला येत असून श्रीलंकेकडील परकीय गंगाजळी दोन अब्ज डॉलर्सच्याही खाली गेली आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या महिन्यात श्रीलंकेच्या परकीय गंगाजळीत केवळ १.९३ अब्ज डॉलर्स शिल्लक होते. याशिवाय देशावर असलेल्या कर्जामधील ४ अब्ज डॉलर्सचे व्याज थकीत होते. श्रीलंकेने जानेवारी महिन्यात ५० कोटी डॉलर्सच्या कर्जरोख्यांची परतफेड केली होती. तर जुलै महिन्यात १ अब्ज डॉलर्सचे कर्ज श्रीलंकेला फेडावे लागणार आहे.

श्रीलंकेवर सध्या ५१ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात श्रीलंकेवर ३५ अब्ज डॉलर्सचे कर्ज होते. एका वर्षातच श्रीलंकेवरील बाह्यकर्जाचे प्रमाण १६ अब्ज डॉलर्सने वाढले आहे. याचे प्रमुख कारण श्रीलंकेची काही कर्जे इतकी महाग दराने घेण्यात आली आहे की ती फेडण्यासाठी श्रीलंकेकडील डॉलर्स मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहेत. ही महाग कर्जे बहुतांश चीनने दिलेली आहेत. चीनने या कर्जांचे पुनर्गंठन अर्थात रिस्ट्रक्चरींग करावे अशी मागणी श्रीलंकेने केली होती. मात्र चीनने यासाठी श्रीलंकेला स्पष्ट नकार दिला होता.

अशा स्थितीत श्रीलंकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशाजवळील परकीय गंगाजळ जवळजवळ संपली असताना कर्जफेड करणे शक्यच नसल्याचे श्रीलंकेने म्हटले आहे. मंगळवारी श्रीलंकेच्या अर्थमंत्रालयाने सर्व कर्जांची परतफेड थांबविण्यात येत असल्याचे जाहीर केले. १२ एप्रिलपर्यंत देशावर जी कर्ज आहेत, त्यावर हा निर्णय लागू होईल. श्रीलंकेने याद्वारे आपण कर्ज डिफॉल्ट करणार असल्याचे जाहीर केले. आंतरराष्ट्रीय कर्जरोखे, द्विपक्षीय करारातून मिळालेले कर्ज, व्यावसायिक बँकांकडून घेण्यात आलेली, तसेच वित्तसंस्थांकडून घेतलेल्या सर्वच कर्जांबद्दल हेच धोरण ठरविण्यात आल्याचे श्रीलंकेने स्पष्ट केले आहे.

या घोषणेनंतर कर्जावरील थकीत व्याजासाठी कर्ज देणार्‍या देशांना वाट पाहावी लागेल. नाहीतर त्यांच्याजवळ श्रीलंकन रुपयांमध्ये परतफेडीचा पर्याय आहे, असे श्रीलंकेने म्हटले आहे. श्रीलंकेच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर पी. नंदपाल विरसिंघे यांनी तर सध्या श्रीलंकेला बाह्य कर्जाच्या परतफेडीची चिंता सोडून देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आपण कर्जाचे पुनर्गंठन करण्याचा प्रयत्न करून डिफॉल्टर होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करू, असेही विरसिंघे यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेला ‘आयएमएफ’कडून बेलआऊट मिळण्याची अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने या संकटातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याची मागणी ‘आयएमएफ’कडे केली होती. तसा प्रस्ताव श्रीलंकेने सादर केला होता. मात्र अजून यावर ‘आयएमएफ’ने कोणताही निर्णय घेतलेला नाही. १८ एप्रिल रोजी बेलआऊटसाठी ‘आयएमएफ’बरोबर श्रीलंकेची चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. ‘आयएमएफ’बरोबर करारानंतर कर्जाची परतफेड पुन्हा सुरू होईल, असेही श्रीलंकेने म्हटले आहे.

श्रीलंकेत आर्थिक संकटाने कोरोनापेक्षा अधिक मृत्यू होतील – वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संघटनेचा इशारा

कोलंबो – श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे देशात परिस्थिती बिकट बनली आहे. महागाईचा प्रचंड आगडोंब उसळला असून अनेक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. यामध्ये औषधे व वैद्यकीय साहित्यांची कमतरता असून यामुळे आरोग्य यंत्रणा कोलंमडण्याच्या स्थितीत आहे. या पार्श्‍वभूमीवर श्रीलंकेच्या सरकारी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संघटनेने (एसएलएमए) भूक आणि औषधोपचाराविना श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतील. कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती असेल, असा इशारा दिला आहे.

आर्थिक संकट वाढल्यानंतर श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा, विजेचा तुटवडा यामध्ये जनता होरपळत आहे. आयात करण्यास परकीय गंगजळी कमी असल्याने जानेवारी महिन्यातच श्रीलंकेने अनेक वस्तूंची आयात थांबविली होती. सध्या श्रीलंकेचा महागाई दर १७ टक्क्यांच्या पुढे पोहोचला असून संपूर्ण आशियात हा दर सर्वाधिक आहे. अशा स्थितीत श्रीलंकेत आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत आहे. श्रीलंकेतील रुग्णालयांमधून आता आयात वैद्यकीय सामुग्रीचा, तसेच औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. या तुटवड्यामुळे श्रीलंकेतील कितीतरी रुग्णालयांनी सामान्य शस्त्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय उपकरणे व प्रमुख औषधे मिळत नसून यामुळे आपत्कालीन उपचारही लवकर मिळतील अशी स्थिती नसल्याचे, श्रीलंका मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.

पुढील दोन आठवड्यात श्रीलंकेतील आरोग्य सुविधांसमोरील स्थिती अधिकच बिकट होईल. जर योग्यवेळी पावले उचलली नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतील. हे मृत्यू औषधांच्या कमतरतेमुळे होतील, तसेच रुग्णालयातही औषधांसाठी दंगली उसळतील, असा इशारा एसएलएमए सचिव डॉ. सेनल फेर्नांडो यांनी दिला आहे. सध्या श्रीलंकेतील डॉक्टरांसमोर कोणावर उपचार करायचे व कोणावर नाही, याचा निर्णय घ्यावा लागत आहे. परिस्थिती सुधारली नाही, तर आरोग्य यंत्रणा कोलमडल्यामुळे होणारे मृत्यू हे कोरोनाने झालेल्या मृत्यूपेक्षा अधिक असतील, असा एसएलएमएने बजावले आहे.

 

leave a reply