कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या नव्या उपप्रकारावर संशोधक अभ्यास करीत आहेत

- केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया

नवी दिल्ली – कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या एवाय.४.२ या उपप्रकाराची लागण झालेले रुग्ण भारतात आढळल्यावर चिंता वाढली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचेे (आयसीएमआर) संशोधक डॉ. समीरन पांडा यांनी नवा व्हेरियंट अधिक संक्रमक असल्याचे म्हटले आहे. मात्र घातक नसल्याचेही स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर आयसीएमआर आणि नॅशनल कन्ट्रोल ऑफ डिसिज कन्ट्रोलचे (एनसीडीसी) संशोधन एवाय.४.२ या व्हेरियंटवर अभ्यास सर्वच पातळीवर करीत आहे. सरकारही या विषाणूच्या संक्रमणाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी म्हटले आहे. तर कर्नाटकात या विषाणूचे या नव्या उपप्रकाराचे आणखी दोन संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्याचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या नव्या उपप्रकारावर संशोधक अभ्यास करीत आहेत - केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावियाकोरोनाची दुसर्‍या लाटेनंतर सध्या दरदिवशी आढळणार्‍या रुग्णांची संख्या १२ हजारांपर्यंत खाली आली आहे. तर अजून सुमारे ३०० मृत्यू दरदिवशी होत आहे. मात्र देशभरात साथ नियंत्रणात आल्याचे दिसत असताना ब्रिटनमध्ये नव्या लाटेत वेगाने संक्रमण पसरण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या एवाय.४.२ या व्हेरियंटचे रुग्ण भारतात आढळले आहेत. एकूण २० रुग्ण आढळल्याच्या बातम्या एका दिवसांपूर्वी आल्या होत्या. मात्र जीआयएसएआयडी या कोविड संदर्भात माहितीचा साठा ठेवणार्‍या संस्थेच्या हवाल्याने करण्यात आलेल्या दाव्यानुसार याचे सात रुग्ण देशात आढळले आहेत. जिनोम सिक्वेन्सिंग तपासण्यासाठी पाठविण्यात आलेल्या नमून्यात सतरा नमूने हे एवाय.४.२ बाधीत रुग्णांचे होते. यामध्ये सात रुग्ण आंध्र प्रदेशातील आहेत, चार केरळमधील असून कर्नाटक व तेलंगणामधील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. तर महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये एक एक रुग्ण आढळला आहे.

मंगळवारी कर्नाटकातही कोरोनाच्या या नव्या उपप्रकाराची लागण झाल्याचा संशय असलेले दोन रुग्ण आढळले. या संशयीत रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्स तपासण्यासाठी बंगळुरूमधील लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीही एवाय.४.२च्या संक्रमणावर सरकारची बारकाईने नजर आहे. एनसीडीसी आणि आयसीएमआरकडून विषाणूंच्या प्रकारावर सर्व बाजूने अभ्यास केला जातो. हा अभ्यास सुरू असल्याचे मंडाविया यांनी स्पष्ट केले.

leave a reply