केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ‘ओपेक’ देशांना भारतात गुंतवणुकीचे आवाहन

नवी दिल्ली – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘ओपेक’ देशांना भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले. ‘कोरोनाच्या संकटानंतर इंधन तेल आणि इतर ऊर्जा क्षेत्रात झालेल्या बदलाकडे ‘ओपेक’ देशांचे लक्ष द्यावे. या क्षेत्रात कोरोनाच्या संकटामुळे पुरवठा साखळीत अडथळे आले असून इंधन तेलाच्या किमतींमध्ये होणाऱ्या चढउतार आणि विसंगतीकडे ‘ओपेक’ देशांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे’, असे , प्रधान म्हणाले. ‘भारत-ओपेक’ देशांची चौथी उच्चस्तरीय बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी प्रधान बोलत होते.

इंधन तेल उत्पादक आणि पुरवठादार ‘ओपेक’ देशांबरोबर कोरोनाच्या संकटानंतर आयोजित पहिली बैठक शुक्रवारी झाली. इंधन सुरक्षेच्या दृष्टीने ‘ओपेक’ भारताच्या ‘मौल्यवान भागीदार’ आहे. ‘ओपेक’ देश भारताला ७८ टक्के इंधनाचा पुरवठा करतात. याशिवाय भारताला ५९ टक्के ‘एलपीजी’ आणि ३८ टक्के ‘एलएनजी’ पुरवठा ओपेक देश करतात. अशा शब्दात भारताच्या दृष्टीने ‘ओपेक’ देशांचे महत्व प्रधान यांनी अधोरेखित केले.

जागतिक ऊर्जा क्षेत्रात झपाट्याने बदल, या क्षेत्रात वाढती आव्हाने , तसेच इंधन तेल बाजाराला संतुलित ठेवण्यासाठी ओपेक देशांकडून केल्या जाणाऱ्या उपायांवर यावेळी चर्चा झाल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. भारताला इंधन पुरवठ्याची हमी या देशांनी दिल्याचे, प्रधान म्हणाले. भारताचा ऊर्जा बाजारपेठ इतर बाजारांपेक्षा वेगाने वाढत आहे. भारतातील या मागणीचा ओपेक देशांना दीर्घकालीन लाभ मिळेल, असे सांगून त्यामुळे ओपेक देशांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन प्रधान यांनी केले.

leave a reply