केंद्रीय गृहमंत्र्यांकडून किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा

किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावानवी दिल्ली – गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी किनारी सुरक्षा व्यवस्थेविषयक सल्लागार समितीची बैठकीत सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा घेतला. किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम बनविण्यासाठी यावेळी उपस्थित वरीष्ठ अधिकार्‍यांनी काही शिफारसी केल्या असून यावर सरकार विचार करणार आहे. किनारपट्टीची सुरक्षा अधिक अभेद्य बनविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार असून लवकरच सागरी सुरक्षाविषयक यंत्रणा व संबंधित मंत्रालयाची एक उच्चस्तरीय बैठकही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होईल, असे वृत्त आहे.

२००८ सालच्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांनी सागरी मार्गाचा वापर करून मुंबईत दाखल झाले होते. हा आतापर्यंतचा भारतामध्ये झालेला सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. यानंतर किनारपट्टीच्या सुरक्षेबाबात लक्ष पुरविण्यास सुरूवात झाली. साडेसात हजार किलोमीटरवरून अधीक सागरी किनारपट्टी आणि एक हजार १९७ बेटे लाभलेल्या भारतासमोरील किनारपट्टीच्या सुरक्षेविषयक आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. सागरी मार्गाने दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याबरोबर शस्त्र व अमली पदार्थांच्या तस्करीच्या काही मोठ्या घटना गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी किनारी सुरक्षा व्यवस्थेविषयक सल्लागार समितीची बैठक बोलावली होती. यावर सागरी किनारपट्टीची सुरक्षा अधिक अभेद्य करण्यासंदर्भात उपाययोजनांवरही चर्चा करणयात आली. यावेळी तटरक्षकदलाचे वरीष्ठ अधिकारी, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि अजय मिश्रा, केंद्रीय गृहसचिव, मस्त्यपालन सचिवांसह या मंत्रालयाचे इतर वरीष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

भूसीमेच्या सुरक्षेप्रमाणे सागरी सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी यावेळी स्वतंत्र किनारी पोलीस दल किनारी राज्यांमध्ये स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली. याशिवाय किनारपट्टी व बेटांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्य ठेवण्याचा विचारही पुढे आला. या बैठकीत आलेल्या शिफारसींवर गृहमंत्रालय विचार करणार आहे. तसेच सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेसंबंधीत यंत्रणा व मंत्रालयांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी उपाय करण्यात येणार आहेत.

यावेळी किनारी सुरक्षा सर्व राज्यांच्या सहकार्याने व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भक्कम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. गृहमंत्रालय किनारी सुरक्षेच्या बाबतीत येणार्‍या आव्हानांचे गांभीर्याने अध्ययन करत आहे, असे अमित शाह यावेळी म्हणाले. प्रथमच भारतातील सर्व बेटांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, ही बाबही गृहमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली. या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असे केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

leave a reply