युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

लष्करी कारवाई

मॉस्को – ‘युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईबाबत आपल्या मनात तिळमात्रही शंका नाही. या लष्करी कारवाईची उद्दिष्टे स्पष्ट व उदात्त होती. ही उद्दिष्टे पूर्ण होणार आहेत. रशियासमोर दुसरा पर्यायच नव्हता. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा योग्य निर्णय होता’, अशा शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ल्याचे समर्थन केले. हे समर्थन करतानाच रशिया यापुढे कधीही पाश्‍चिमात्यांवर अवलंबून राहणार नाही, असेही रशियन राष्ट्राध्यक्षांनी बजावले.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला दीड महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. या काळात रशियाने पूर्व तसेच दक्षिण युक्रेनमधील अनेक भागांवर ताबा मिळविला आहे. राजधानी किव्ह व उत्तर युक्रेनमधील काही भागांमधून रशियन फौजांनी माघार घेतली आहे. रशियाची ही माघार म्हणजे पुतिन यांचा पराभव असल्याचे दावे पाश्‍चिमात्यांकडून करण्यात येत आहेत. रशियातील काही गटही युक्रेनवरील हल्ल्यानंतर पुतिन यांची सत्ता जाईल, असे सांगत आहेत. या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांनी उघडपणे समर्थन करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

लष्करी कारवाई

रशियाच्या अतिपूर्वेकडील अमूर प्रांतातील अंतराळकेंद्रावर आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पुतिन यांनी युक्रेनवरील कारवाई योग्य असल्याचे ठामपणे सांगितले. त्याचवेळी युक्रेन हल्ल्याच्या मुद्यावर रशियावर निर्बंध लादून एकटे पाडण्याची योजना कधीही यशस्वी होणार नसल्याचेही बजावले. ‘रशियाला कधीही एकटे पाडले जाऊ शकत नाही. सध्याच्या आधुनिक जगात कोणालाही वेगळे पाडणे अशक्य आहे. रशियासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या देशाच्या बाबतीत हे कधीच शक्य होणार नाही’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला. यावेळी त्यांनी सहा दशकांपूर्वी युरी गागारीन या रशियन अंतराळवीराने केलेल्या कामगिरीचा दाखला दिला.

लष्करी कारवाई

‘गेल्या शतकातही सोव्हिएत संघराज्याविरोधात पूर्ण निर्बंध लादण्यात आले होते. सोव्हिएतला वेगळे पाडण्यातही यश मिळाले होते. तरीही अंतराळात जाण्याचा पहिला मान सोव्हिएत रशियानेच पटकावला होता’, याकडे पुतिन यांनी लक्ष वेधले. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनीही युक्रेनवरील हल्ल्याचे समर्थन केले आहे.

‘रशियाने युक्रेनमध्ये केलेली कारवाई अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेली जागतिक व्यवस्था संपविण्यासाठी करण्यात आली आहे’, असा दावा परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी केला. नाटोचा अनिर्बंध विस्तार आणि अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांकडून जागतिक स्तरावर प्रभाव गाजविण्याची महत्त्वाकांक्षा यांची अखेर करण्यासाठी रशियाने युक्रेनमध्ये लष्करी मोहीम राबविली, असेही लॅव्हरोव्ह पुढे म्हणाले. अमेरिकेच्या इच्छेसमोर रशिया कधीही झुकणार नाही, असा इशाराही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

leave a reply