सर्बिया फ्रान्सकडून रफायल विमानांची खरेदी करणार

बेलग्रेड – सर्बिया लवकरच फ्रान्सकडून १२ बहुउद्देशीय रफायल विमाने खरेदी करणार आहे. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांनी सोमवारी ही घोषणा केली. गेल्या आठवड्यातच दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आलेले वुकिक हे रशिया समर्थक युरोपिय नेते म्हणून ओळखले जातात. पण फ्रान्सकडून रफायल विमानांच्या खरेदीची घोषणा करून राष्ट्राध्यक्ष वुकिक यांनी आपल्या भूमिकेत बदल झाल्याचे संकेत दिले. युरोपिय माध्यमे तसा दावा करीत आहेत.

राष्ट्राध्यक्ष वुकिक यांनी युरोपिय वृत्तसंस्थेशी बोलताना २४ लढाऊ विमानांच्या खरेदीची घोषणा केली. यापैकी बारा फ्रान्सची रफायल विमाने असतील. तर पाश्चिमात्य देशांच्या वापरात असलेली आणखी १२ विमाने खरेदी करणार असल्याचे, राष्ट्राध्यक्ष वुकिक यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत सर्बियाचे लष्कर रशियन बनावटीची शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य वापरत होते. सर्बियाने मिग-२९ लढाऊ विमाने, एमआय-३५ हेलिकॉप्टर, टी-७२ रणगाडे, रडार तसेच क्षेपणास्त्र यंत्रणा या रशियाकडून खरेदी केलेल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष वुकिक रशियासमर्थक नेते म्हणून ओळखले जातात. अनेक मुद्यांवर त्यांनी रशियाची बाजू उचलून धरली होती.

या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात सर्बियात पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष वुकिक यांना मिळालेला विजय रशियाला खूश करणारा व युरोपिय देशांच्या अडचणी वाढविणारा ठरेल, असा दावा युरोपातील विश्लेषकांनी केला होता. मात्र राष्ट्राध्यक्ष वुकिक यांनी या विजयाला आठवडा होत नाही, तोच रशियाकडून लढाऊ विमानांची खरेदी टाळून, फ्रान्सची रफायल विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच सर्बियाने चीनकडून छुप्यारितीने हवाई सुरक्षा यंत्रणा मिळवल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच तुर्कीने सर्बियाला हल्लेखोर ड्रोन पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.

हा राष्ट्राध्यक्ष वुकिक यांच्या धोरणात झालेला बदल रशियाच्या चिंता वाढविणारा ठरू शकते. अमेरिकेने रशियावर टाकलेल्या निर्बंधांचा फटका सर्बियाला बसू नये, यासाठी राष्ट्राध्यक्ष वुकिक यांनी हे निर्णय घेतल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply