युएईच्या जनतेला लक्ष्य करणार्‍या हौथी बंडखोरांची खुशामत कधी थांबणार

- युएईची संयुक्त राष्ट्रसंघावर टीका

न्यूयॉर्क – ‘थेट युएईच्या राजधानीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागून नागरिकांचा बळी घेणार्‍या येमेनमधील हौथी बंडखोरांवर कारवाई होईल का? या संघटनेवर कठोर निर्बंध लादले जातील का? या दहशतवादी संघटनेची खुशामत कधी थांबणार? – अशा प्रश्‍नांचा घणाघात युएईने केला. राष्ट्रसंघातील युएईच्या राजदूत लाना नुसिबेह यांनी हौथी बंडखोरांबाबत बोटचेपे धोरणे स्वीकारणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघावर ही टीका केली.

गेल्या सात वर्षांहून अधिक काळ येमेनमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धावर संयुक्त राष्ट्रसंघ तसेच आंतरराष्ट्रीय समुदाय चिंता व्यक्त करीत आहे. गेल्या महिन्यात येमेनमधील संघर्षात ६५० जण ठार किंवा गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जातो. मागील तीन वर्षांमध्ये येमेनचे सरकार आणि हौथी बंडखोरांमधील संघर्षात एवढ्या मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याची ही पहिली घटना असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले होते. तसेच हे गृहयुद्ध वेळीच रोखले नाही तर येमेनमधील सुमारे ८० लाख जनता मानवतावादी सहाय्यापासून वंचित राहील, अशी भीती राष्ट्रसंघाचे विशेषदूत हॅन्स ग्रंडबर्ग यांनी व्यक्त केली होती.

पण युएईच्या राजदूत लाना नुसिबेह यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेषदूत ग्रंडबर्ग यांचे याआधीच्या घडामोडींकडे लक्ष वेधले. येमेनमधील गृहयुद्ध थांबावे, यासाठी सौदी अरेबिया आणि युएईने हौथी बंडखोरांना संघर्षबंदी व शांतीचर्चेचा प्रस्ताव दिला होता. सौदी, युएई व अरब मित्रदेशांनी पुढाकार घेऊन संघर्षबंदी लागू केली होती. पण हौथी बंडखोरांनी हल्ले सुरू करून संघर्षबंदीच्या चिंधड्या उडविल्या होत्या, याची आठवण नुसिबेह यांनी करुन दिली.

‘ग्रंडबर्ग यांनी देखील हौथींना शांतीचर्चेत सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. पण संयुक्त राष्ट्रसंघ हे प्रयत्न करीत असताना हौथी बंडखोर युएईच्या नागरी ठिकाणांना लक्ष्य करून आमच्या निरपराध नागरिकांचा बळी घेत आहेत, याकडे राष्ट्रसंघ लक्ष देणार आहे का? असा खणखणीत सवाल नुसिबेह यांनी केला.

युएईसह अरब देशांना लक्ष्य करणार्‍या आक्रमक हौथींची खोड मोडण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरल्याचा ठपका नुसिबेह यांनी ठेवला. संयुक्त राष्ट्रसंघाने येमेनमधील या इराणसंलग्न हौथींना दहशतवादी घोषित करावे, अशी मागणी युएईच्या राजदूतांनी केली. त्याचबरोबर हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांना उत्तर देण्याचा युएईकडे सार्वभौम अधिकार असल्याचा इशाराही राजदूत नुसिबेह यांनी दिला.

leave a reply