तैवानमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यास चीनला गंभीर किंमत चुकवावी लागेल

- तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचा चीनला इशारा

गंभीर किंमत चुकवावीतैपेई – ‘तैवानकडे स्वत:ची सुरक्षा करण्याची जिद्द आणि क्षमता आहे, हे शत्रूला दाखवून द्यावे लागेल. तैवानमध्ये घुसखोरी केली किंवा तसा प्रयत्न जरी झाला तर त्यासाठी अतिशय गंभीर किंमत चुकवावी लागेल’, असा थेट इशारा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी दिला. तसेच स्वसंरक्षणाचा तैवानचा निर्धार कुणीही बाधित करू शकत नाही, असे राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी जाहीर केले. अमेरिकी विश्लेषक व जपानचे प्रतिनिधीमंडळ तैवानच्या भेटीवर असताना राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी चीनला दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

१९५८ सालच्या ऑगस्ट महिन्यात चीनने तैवानच्या किनमेन आणि मात्सू या बेटांवर जोरदार हवाई हल्ले चढविले होते. पण या कारवाईनंतरही चीनचे लष्कर तैवानच्या या बेटांचा ताबा घेऊ शकले नव्हते. चीनने तैवानवर केलेल्या या हल्ल्याला ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी’च्या ‘हूवर इन्स्टिट्युशन’ या अभ्यासगटाचे विश्लेषक तैवानमध्ये दाखल झाले असून त्यांनी राष्ट्राध्यक्ष इंग-वेन यांची भेट घेतली. नेमक्या याचवेळी जपानच्या संसदीय सदस्यांचे शिष्टमंडळ देखील तैपेईमध्ये दाखल झाले आहे.

अमेरिकन विश्लेषक व जपानच्या संसद सदस्यांच्या उपस्थितीत, तैवानी संरक्षणदलांना संबोधित करताना राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी ६४ वर्षांपूर्वी चीनविरोधी संघर्षात तैवानच्या लष्कर व जनतेने दाखविलेल्या धाडसाचे स्वागत केले. ‘आपल्या देशाची सुरक्षा करताना तैवानी जनतेचा निर्धार कधीही डळमळीत होत नाही, हे याआधीही तैवानने दाखवून दिले होते, आजही दाखवित आहे आणि यापुढेही दाखवू शकतो. शांती, सुरक्षा, स्वातंत्र्य आणि समृद्धीसाठी तैवानच्या जनतेकडे ठामपणा आणि विश्वास आहे, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी केली.

गंभीर किंमत चुकवावीतर १९५८ सालच्या युद्धाचा उल्लेख करून तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशाचा निर्धार कुणीही बाधित करू शकणार नसल्याचा दावा केला. ६४ वर्षांपूर्वी तैवानच्या जवान आणि नागरिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आजचा लोकशाहीवादी तैवान सुरक्षित राहू शकल्याची घोषणा करून राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी चीनला इशारा दिल्याचे दिसत आहे. तर जपानचे वरिष्ठ संसदसदस्य केजी फुरूया यांच्याशी बोलताना राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी चीनपासून असलेला धोका अधोरेखित केला. चीन तैवानविरोधात दाखवत असलेली आक्रमकता इंडो-पॅसिफिकच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरेल, असे इंग-वेन यांनी बजावले.

अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगटाचे विश्लेषक जेम्स ओ. एलीज्‌‍ यांनीदेखील आपल्या सहाय्यकांसह तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. अमेरिकन जनता तैवानबरोबरच्या सहकार्यासाठी नेहमीच तयार आहे, असे संकेत या तैवान भेटीतून मिळाले असतील, असा दावा एलीज्‌‍ यांनी केला. जेम्स एलीज्‌‍ हे अमेरिकन नौदलातून ॲडमिरल पदावरुन निवृत्त झालेले अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या या भेटीचे महत्त्व देखील वाढले आहे.

दरम्यान, चीनची लढाऊ विमाने आणि विनाशिकांनी मंगळवारी तैवानच्या हवाई व सागरी क्षेत्राजवळून पुन्हा एकदा प्रवास केला. जवळपास २९ लढाऊ विमाने आणि चार विनाशिकांनी तैवानच्या आखातात गस्त घालून मध्य रेषेपर्यंत प्रवास केला. यापैकी चार विमानांनी तैवानची मध्यरेषा ओलांडल्याचा आरोप तैवान करीत आहे. त्यामुळे लढाऊ विमाने आणि विनाशिका रवाना करून चीन तैवानवरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण तैवान देखील आपल्या पद्धतीने चीनला उत्तर देत आहे.

leave a reply