कोरियन क्षेत्राजवळ अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका तैनात

टोकिओ/सेऊल – अमेरिकेने विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस अब्राहम लिंकन’ आपल्या इतर युद्धनौकांच्या ताफ्यासह कोरियन क्षेत्रात तैनात केली आहे. दक्षिण कोरियाबरोबर आयोजित केलेल्या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी ही तैनाती असल्याचा दावा केला जातो. तसेच अणुचाचणीच्या तयारीत असलेल्या उत्तर कोरियाला इशारा देण्यासाठी अमेरिकेने ही तैनाती केल्याचे दिसत आहे.

२०१७ साली अमेरिकेने जपान आणि दक्षिण कोरियाच्या सागरी क्षेत्रात विमानवाहू युद्धनौकांचा ताफा तैनात केला होता. मात्र तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची उत्तर कोरियाच्या हुकूमशहांशी चर्चा झाली. त्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या थांबविल्या आणि अमेरिकेनेही कोरियन क्षेत्रातील युद्धनौकांचा ताफा मागे घेतला. पण पुन्हा एकदा उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटाला लावला असून यामुळे कोरियन क्षेत्रातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

या पार्श्‍वभूमीवर, युएसएस अब्राहम लिंकनची ही तैनाती करून अमेरिकेने उत्तर कोरियाला इशारा दिल्याचा दावा केला जातो. दरम्यान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातील वाढत्या लष्करी सहकार्यावर चीनने टीका केली आहे. दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या ‘क्वाड’चे प्यादे बनू नये, असा इशारा चीनच्या मुखपत्राने दिला आहे.

leave a reply