सौदी व बाहरिनने लेबेनॉनच्या राजदूतांची हकालपट्टी केली

राजदूतांची हकालपट्टीरियाध/बैरूत – सौदी अरेबिया, बाहरिन यांचे लेबेनॉनबरोबरील संबंध ताणले गेले आहेत. सौदी व बाहरिनने लेबेनॉनच्या राजदूतांची हकालपट्टी केली असून आपल्या नागरिकांनाही लेबेनॉनला भेट देण्याचे टाळा, असा संदेश दिला आहे. तर अरब देशांंमधील एकजूट कायम राखण्यासाठी सौदी व बाहरिनने हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन लेबेनॉनने केले.

चार दिवसांपूर्वी लेबेनॉनचे नवनियुक्त माहिती मंत्री जॉर्ज कुर्दोही यांचा एक व्हिडिओ लेबेनीज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला. या व्हिडिओमध्ये येमेनमधील गृहयुद्धाबाबत बोलताना कुर्दोही यांनी हौथी बंडखोर परकीयांच्या आक्रमणापासून आत्मरक्षण करीत असल्याचे सांगून सौदी व अरब मित्रदेशांवर अप्रत्यक्ष टीका केली होती.

यावर अरब देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’मधील सौदी, युएई, कुवैत आणि बाहरिन या देशांनी लेबेनीज राजदूतांना समन्स बजावले होते. तर या चारही देशांबरोबर कतार आणि ओमानने देखील लेबेनॉनवर टीका केली. अरब देशांबरोबरचे संबंध धोक्यात टाकणार्‍या कुर्दोही यांना सरकारमधून हाकलून द्या, अशी मागणी लेबेनॉनमधूनही झाली होती.

पण लेबेनॉनचे पंतप्रधान नजिब मिकाती यांनी याकडे दुर्लक्ष केले. तर कुर्दोही यांनी देखील सदर व्हिडिओ हा महिन्याभरापूर्वीचा असल्याचे सांगून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. तर इराणसमर्थक हिजबुल्लाहने कुर्दोही यांच्या विधानांचे समर्थन केले. त्यामुळे अधिकच भडकलेल्या सौदी व बाहरिनने लेबेनॉनच्या राजदूतांना देश सोडण्याची सूचना केली. लेबेनॉनच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याआधी सौदी व बाहरिनने लेबेनॉनमधील आपल्या राजदूतांना माघारी बोलाविले.

आखाती देशांकडून लेबेनॉनला मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले जाते. गेल्या वर्षभरापासून लेबेनॉनची अर्थव्यवस्था संकटात सापडली असून सौदी-बाहरिनचा असहकार लेबेनॉनच्या आर्थिक अडचणीत अधिकच भर घालणारा ठरू शकतो.

leave a reply