ग्रीस आणि सायप्रसच्या क्षेत्रात तुर्की नवा वाद पेटविणार

-ग्रीक वर्तमानपत्राचा इशारा

turkey shipअथेन्स – गेल्या आठवड्यात अमेरिकेने सायप्रसवर टाकलेले लष्करी निर्बंध मागे घेतले. तर त्याआधी अमेरिकेने ग्रीसला एफ-35 ही अतिप्रगत लढाऊ विमाने पुरविण्यासंबंधी हालचाली केल्या होत्या. यामुळे संतापलेला तुर्की ग्रीस आणि सायप्रसमधील भूमध्य समुद्रात कुरापती काढून नवा वाद पेटवू शकतो, असा इशारा ग्रीसमधील प्रसिद्ध वर्तमानपत्राने दिला.

तुर्कीच्या दक्षिणेकडील तासुचू बंदरातील हालचाली वाढल्याचे ग्रीक वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. तुर्कीचे ‘ओरूक रेईस’ शोध जहाज या बंदरात तैनात आहे. याद्वारे भूमध्य समुद्रातील वादग्रस्त क्षेत्रात उत्खननाचे काम सुरू करून तुर्की ग्रीस आणि सायप्रसला चिथावणी देऊ शकतो, असा दावा सदर वर्तमानपत्राने केला. अमेरिकेकडून ग्रीस व सायप्रसला मिळणाऱ्या लष्करी सहाय्यामुळे खवळलेल्या तुर्कीने हा निर्णय घेतला आहे.

त्यातही काही वर्षांपूर्वी अमेरिका तुर्कीला एफ-35 ही अतिप्रगत स्टेल्थ श्रेणीतील विमाने पुरविणार होती. पण तुर्कीची रशियाबरोबरची मैत्री आणि अन्य कारणांमुळे अमेरिकेने सदर सहकार्य रोखून तुर्कीवर निर्बंध लादले. आता हीच एफ-35 विमाने अमेरिका ग्रीसला पुरविणार असल्यामुळे तुर्की अस्वस्थ झाल्याचा दावा केला जातो. अमेरिकेचा हा निर्णय तुर्कीला ग्रीसविरोधात भडकविणारा ठरू शकतो, याकडे स्थानिक विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply