रशियाच्या सहकार्यामुळे युक्रेनमधून भारतीयांची सुरक्षित सुटका

नवी दिल्ली/किव्ह – युक्रेनमधील सुमारे १७ हजार भारतीय बाहेर पडले आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. तसेच भारतीय विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांचा मानवी ढालीसारखा वापर करीत असल्याचा रशियन अधिकार्‍यांचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने नाकारला. अशा स्वरुपाची माहिती आपल्यापर्यंत अजूनही आलेली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारताने केलेल्या आवाहनामुळे विद्यार्थ्यांनी खारकिव्ह सोडेपर्यंत रशियाने काही तासांसाठी या शहरावर हल्ले चढविले नव्हते, अशी बातमी समोर आली आहे.

रशियाच्या सहकार्यामुळेकेंद्रीय मंत्रिमंडळाचे चार सदस्य युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाऊन युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होते. तसेच भारताची वायुसेना देखील युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेत सहभागी झाली होती. आत्तापर्यंत १७ हजाराहून अधिक भारतीय संघर्षग्रस्त युक्रेनमधून बाहेर पडले आहेत. १० मार्चपर्यंत इथल्या सर्वच भारतीयांना मायदेशी आणले जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.

दरम्यान, युक्रेनमध्ये रशिया करीत असलेले हल्ले टाळण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने भारतीय विद्यार्थ्यांचे अपहरण केले व त्यांचा ढालीसारखा वापर केल्याचा आरोप रशियन अधिकार्‍यांनी केला होता. याआधी युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना त्रास देऊन मारहाण करण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. अशा परिस्थितीत रशियाने केलेल्या या आरोपाचे गांभीर्य वाढले होते. पण परराष्ट्र मंत्रालयाने अशी माहिती समोर आलेली नसल्याचे सांगून हा वाद टाळल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करून युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही काळ हल्ले थांबविण्याचे आवाहन केले होते. याचा लाभ घेऊन युक्रेनच्या खारकिव्ह शहरातून हजार भारतीय सुरक्षितरित्या बाहेर पडू शकले. सध्या रशियाच्या हल्ल्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी इतर देशांचे विद्यार्थी व नागरिक देखील तिरंगा फडकावत असल्याच्या बातम्या येत आहेत.

रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी १३० बसेस तयार असल्याची माहिती दिली. त्याचवेळी युक्रेन मात्र भारतीयांच्या सुटकेसाठी अधिक सहकार्य करण्यास तयार नसून वेगवेगळ्या मार्गाने भारताच्या विरोधातील आपली नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.

leave a reply