सिरियातील तुर्कीच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियन लष्करी अधिकाऱ्यांची कुर्द नेत्यांशी भेट

कुर्दबैरूत – कोणत्याही क्षणी तुर्कीचे लष्कर सिरियाच्या उत्तरेकडील भागात घुसून कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले चढवू शकते. सिरियात कारवाई करण्यापासून कोणीही तुर्कीला रोखू शकत नाही, असा इशारा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला होता. यानंतर सिरियातील रशियन लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुर्द नेत्यांची भेट घेतली आहे. तुर्कीचे हल्ले रोखण्यासाठी काय केले जाऊ शकते, यावर रशियन अधिकारी व कुर्द नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा दावा केला जातो. रशियन लष्करी अधिकारी व कुर्द नेत्यांची ही भेट तुर्कीला अस्वस्थ करणारी ठरत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

तुर्कीने सिरियात सुरू केलेल्या हल्ल्यांमुळे रशिया व तुर्कीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचा दावा केला जातो. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी सिरियात हल्ले चढविणाऱ्या तुर्कीला दिलेल्या प्रस्तावातून हा तणाव समोर येत आहे. ‘रशिया व तुर्कीमध्ये चांगले संबंध आहेत. असे असताना सिरियाबाबतचे मतभेद संपविण्यासाठी रशिया व तुर्कीने एकत्र येऊन चर्चा करावी’, असे आवाहन पेस्कोव्ह यांनी दोन दिवसांपूर्वी तुर्कीला केले होते. तसेच तुर्कीने सिरियातील हल्ले थांबवावे, असे आवाहन पेस्कोव्ह यांनी केले होते.

पण तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन सिरियातील कारवाईवर ठाम आहे. तुर्कीचे लष्कराने सिरियातील कारवाईबाबतची सर्व तयारी केली आहे. तुर्कीच्या वेळेनुसार, अगदी आवश्यकता भासल्यास अगदी उद्यादेखील तुर्की सिरियात घुसून कारवाई करू शकते, असा इशारा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे प्रवक्ते इब्राहिम कालिन यांनी दिला. त्याचबरोबर सिरियातील तुर्कीच्या कारवाईबाबत रशियाशी चर्चा झाल्याची माहिती कालिन यांनी रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

कुर्दअशा परिस्थितीत, सिरियास्थित रशियन लष्कराचे वरिष्ठ कमांडर लेफ्टनंट जनरल अलेक्झांडर चायको यांनी रविवारी सिरियातील कुर्द संघटनेचे वरिष्ठ कमांडर मझलूम अब्दी यांची भेट घेतली. या भेटीत लेफ्टनंट जनरल चायको यांनी तुर्कीचे सिरियातील हल्ले कसे रोखता येतील, यावर कमांडर अब्दी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती लेबेनॉनस्थित वृत्तवाहिनीने दिली. यासाठी सिरिया-तुर्कीमधील ३० किलोमीटरच्या सीमेवर सिरियन लष्कर तैनात करण्याचे लेफ्टनंट जनरल चायको यांनी सुचविल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीचे सिरियातील हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेचे बायडेन प्रशासन शून्य भूमिका घेत असल्याची टीका कुर्दांकडून होत आहे. ‘अमेरिकेने कुर्दांना आश्वस्त केले असले तरी तुर्कीचे सिरियातील हल्ले रोखण्यासाठी तितके पुरेसे नाही. तुर्कीने सिरियात हल्ले करू नये, यासाठी अमेरिकेने अतिशय कठोर भूमिका स्वीकारावी, तुर्कीला परखड शब्दात बजावावे, अशी मागणी कुर्दांचा नेते मझलूम अब्दी यांनी केली आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात तुर्कीचे हल्ले रोखण्यात अमेरिका अपयशी ठरल्याचा ठपका कुर्दांनी ठेवला होता. तसेच तुर्कीचे आपल्यावर हल्ले सुरू असेपर्यंत सिरियातील ‘आयएस’विरोधी कारवाईतून माघार घेणार असल्याची घोषणा कुर्दांनी केली होती. याचे पडसाद अमेरिकेत उमटले असून बायडेन प्रशासनावर टीका सुरू झाली आहे. सिरियामध्ये ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील संघर्षात कुर्दांनी अमेरिकी लष्कराला मोठे सहाय्य केल्याची आठवण अमेरिकन सिनेटर्स व माध्यमे करून देत आहेत. या संघर्षात ११ हजार कुर्दांचा बळी गेला होता. असे असताना, अमेरिकेने कुर्दांच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास रशिया याचा फायदा घेऊन कुर्दांबरोबर निकटतम सहकार्य प्रस्थापित करील, असा इशारा अमेरिकी माध्यमे देत आहेत.

English हिंदी

leave a reply