परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची जी4 व ब्रिक्सशी चर्चा

जी4न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्त्व हा भारताचा अधिकार ठरतो, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका दिवसापूर्वीच म्हटले होते. त्यानंतर भारताबरोबरच सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्त्वावर दावा सांगणाऱ्या ब्राझिल, जर्मनी आणि जपान या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी जयशंकर यांची चर्चा पार पडली. जी4 नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देशांमधील सदर चर्चेत एकमेकांच्या सदस्यत्त्वाला पूर्ण पाठिंबा देण्यावर एकमत झाले आहे. याबरोबरच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची ब्रिक्स देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही चर्चा पार पडली. ब्रिक्सच्या या बैठकीदरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्याबरोबर पार पडलेली परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची चर्चा लक्षवेधी ठरली.

भारताप्रमाणेच ब्राझिल, जर्मनी आणि जपान हे देश देखील स्थायी सदस्यत्त्वावर दावा सांगत आहेत. या चार देशांनी एकत्र येऊन जी4 ची स्थापना केली असून राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर याची बैठक पार पडली. या बैठकीत एकमेकांच्या दावेदारीला संपूर्ण पाठिंबा देण्यावर एकमत झाले. तसेच सुरक्षा परिषदेच्या सुधारणांची प्रक्रिया खुली व पारदर्शी नसल्याचा ठपकाही या चार देशांनी यावेळी ठेवला. तसेच यासंदर्भात सुरू असलेल्या सरकारांच्या पातळीवरील चर्चेलाही फारशी गती मिळत नसल्याचे सांगून जी4ने यावर नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात अधिक वेळ वाया न दवडता लवकरात लवकरच चर्चेची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी अपेक्षा जी4ने व्यक्त केली आहे.

जी4

भारत, रशिया, चीन, ब्राझिल व दक्षिण आफ्रिका यांच्या ब्रिक्स संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठकही आमसभेदरम्यान पार पडली. या बैठकीत युक्रेनमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. रशिया सदस्य असलेल्या या बैठकीत युक्रेनवरील चर्चा लक्षवेधी बाब ठरते. तर या बैठकीदरम्यान भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेलाही विशेष महत्त्व आल्याचे दिसत होते. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दहशतवाद्यांवरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखणाऱ्या चीनवर टीका केली होती.

भारत अशारितीने उघडपणे आपली नाराजी व्यक्त करीत असताना, चीन त्याला प्रत्युत्तर न देता त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. मात्र ब्रिक्सच्या या बैठकीत दहशतवादाच्या विरोधात दुटप्पी धोरणावर सडकून टीका करण्यात आली व संयुक्त निवेदनातही याचा ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे. याला चीनलाही समर्थन द्यावे लागले, ही विशेष बाब ठरते. पुढच्या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री दहशतवादाच्या विरोधात देशाची भूमिका अधिक प्रखरतेने मांडणार असल्याचे यामुळे उघड होत आहे. इतर देशांकडून त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाकिस्तानसह चीनलाही अस्वस्थ करीत आहे. इतकेच नाही तर भारत योजनाबद्धरित्या आंतरराष्ट्रीय पटलावर आपला प्रभाव वाढवत असून याचा फटका पाकिस्तानला बसेल, अशी चिंता हा देश व्यक्त करीत आहे.

leave a reply