युक्रेनच्या संघर्षामुळे तिसरे महायुद्ध पेटेल

- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

तिसरे महायुद्धवॉशिंग्टन – ‘मी अमेरिकेच्या सत्तेवर असतो, तर हा संघर्ष उभाच राहिला नसता. मी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेऊन हा संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न केले असते. पण युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर युद्ध भडकेल, तिसरे महायुद्ध पेट घेईल’, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तसेच रशिया-युक्रेन संघर्षासाठी अमेरिकेचे कुचकामी नेतृत्व जबाबदार असल्याची टीका ट्रम्प यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापराबाबत रशिया देत असलेली धमकी पोकळ नसल्याचे म्हटले होते. ‘रशियाला न्यूक्लिअर ब्लॅकमेलची धमकी देणाऱ्या पाश्चिमात्य देशांवरच त्यांचा डाव उलटू शकतो. रशियाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान मिळाले तर देश व जनतेच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर करण्यात येईल’, अशा शब्दात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिका व युरोपिय देशांना बजावले होते.

तिसरे महायुद्धरशियन राष्ट्राध्यक्षांच्या या इशाऱ्यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटली होती. अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तसंस्थेने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी ट्रम्प यांनी रशिया-युक्रेनमधील संघर्षासाठी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यातील नेतृत्वाचा अभाव कारणीभूत असल्याची टीका केली. ‘हा संघर्ष पेटू नये, यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाने पुढाकार घेऊन रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा करण्याची, पुतिन यांना भेटण्याची आवश्यकता होती. पण तसे घडले नाही’, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले.

पण आत्ता हा संघर्ष भडकलाच आहे तर, याचे परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटतील. जगभरात संघर्ष भडकून तिसरे महायुद्ध पेटेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. याआधीही माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धामुळे तिसरे महायुद्ध भडकेल, असे बजावले होते. तसेच बायडेन यांच्या नेतृत्वावर ताशेरे ओढले होते. त्यावेळी ट्रम्प यांच्या या विधानांवर अमेरिकेतील माध्यमांनी टीका केली होती. पण बायडेन प्रशासन हा संघर्ष रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर अमेरिकेतील काही माध्यमे व पत्रकार उघडपने युक्रेन युद्धासाठी बायडेन प्रशासनाला जबाबदार धरत आहेत.

leave a reply