अमेरिका-नाटोच्या युरोपातील लष्करी हालचाली वाढल्या

- अमेरिका, जर्मनी, तुर्की, स्पेनकडून युक्रेनला शस्त्रपुरवठा

लष्करी हालचालीवॉशिंग्टन/सवाना/बर्लिन – रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चेचा दुसरा टप्पा सुरू होत असताना, अमेरिका व नाटोने युरोपातील लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. अमेरिकेचे जवान जर्मनीत तर नाटोच्या लष्कराचे पथक रोमानियामध्ये दाखल झाले आहे. त्याचबरोबर अमेरिका व तुर्की यांनी युक्रेनला रशियाविरोधी संघर्षासाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला आहे. तर जर्मनी आणि स्पेनने देखील युक्रेनला शस्त्रे पुरविण्याची घोषणा केली.

अमेरिका, तुर्की व नाटोचे सदस्य असलेले युरोपिय देश युक्रेनला उघडपणे शस्त्रे पुरविण्याची घोषणा करून रशियाला चिथावणी देत आहेत. काही दिवसांपूर्वीच युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविणार्‍या देशांना इतिहासाने पाहिले नसतील, इतके भयंकर परिणाम भोगण्यास भाग पाडू, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका, जर्मनी, स्पेन व तुर्कीने युक्रेनला शस्त्रे पुरविण्याचा निर्णय घेऊन रशियाला आव्हान दिल्याचे दिसते. यामुळे युरोपमधील तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

लष्करी हालचालीफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी गेल्या चार दिवसात दुसर्‍यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली. गुरुवारी दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये जवळपास ९० मिनिटे ही चर्चा सुरू होती. युक्रेनला निःशस्त्र आणि तटस्थ बनविणे ही रशियाच्या युक्रेनवरील लष्करी कारवाईची उद्दिष्टे आहेत. कुठल्याही परिस्थितीत ही उद्दिष्टे साध्य केली जातील, असे या चर्चेत राष्ट्राध्क्ष पुतिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांना सांगितल्याचे वृत्त आहे.

त्याच्या काही तास आधी अमेरिकेच्या जवानांची तुकडी जर्मनीत उतरली. पेंटॅगॉनने अमेरिकेतील वेगवेगळ्या लष्करी तळांवरुन सुमारे १२ हजार जवानांना युरोपमध्ये रवाना करण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय जगभरातील इतर देशांमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या शेकडो जवानांना देखील युरोपमध्ये तैनात करण्याची तयारी पेंटॅगॉनने केल्याच्या बातम्या येत आहेत. या लष्करी हालचाली सुरू असताना, लष्करी हालचालीअमेरिकेचे जवान युक्रेनमधील संघर्षात सहभागी होणार नसल्याच्या घोषणा बायडेन प्रशासनाचे नेते तसेच लष्करी अधिकारी करीत आहेत. अमेरिकेपाठोपाठ नाटोची लष्करी तुकडी रोमानियात दाखल झाल्याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाला आहे. तर अमेरिका, जर्मनी आणि इटलीची २२ लढाऊ विमाने रोमानियाच्या फेतेस्ती आणि मिहैल कोगालनिसेनू हवाईतळावर दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

यामध्ये एफ-१६ फाल्कन तसेच युरोफायटर टायफून या लढाऊ विमानांचा समावेश आहे. या तैनातीमागील उद्दिष्ट स्पष्ट होऊ शकलेले नाही. ब्रिटनचे जवळपास हजार जवान युक्रेनच्या शेजारी देशामध्ये तैनातीसाठी तयार असल्याचा दावा चिनी माध्यमे करीत आहेत. याशिवाय अमेरिकेची ५०० लष्करी हालचालीस्टिंजर आणि रणगाडाभेदी जॅवलिन क्षेपणास्त्रे युक्रेनच्या लष्करापर्यंत पोहोचले आहेत. ४२ वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातील सोव्हिएत रशियाविरोधी संघर्षातही अमेरिकेने पाकिस्तानी लष्कराच्या सहाय्याने तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांना अशाच प्रकारे विमानभेदी आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला होता, याची आठवण लष्करी विश्‍लेषक व माध्यमे करून देत आहेत.

अमेरिकेप्रमाणे जर्मनी आणि स्पेन देखील युक्रेनसाठी विमानभेदी आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे रवाना करणार आहेत. दोन्ही देशांनी तशी घोषणा केली आहे. तर तुर्कीचे बख्तियार ड्रोन्स आपल्या देशात दाखल झाल्याची घोषणा युक्रेनने केली. आधीच तुर्कीने ब्लॅक सीचा मार्ग रोखून रशियन विनाशिकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत, तुर्कीने युक्रेनला केलेला ड्रोन्सचा पुरवठा रशियाला आणखी एक चिथावणी देणारी बाब ठरते आहे.

leave a reply