चीनविरोधातील नाराजीमुळे ‘सॅमसंग’ भारतीय स्मार्टफोन बाजारात अव्वल स्थानावर

नवी दिल्ली – गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर देशभरात चीनविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा ‘सॅमसंग’ या दक्षिण कोरियन कंपनीला झाला. २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत सॅमसंगच्या स्मार्टफोन विक्रीत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चिनी कंपनी ‘शिओमी’ला मागे टाकत सॅमसंग दोन वर्षांनांतर प्रथमच देशातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड म्हणून उदयास आला आहे.

'सॅमसंग'

गेल्याकाही महिन्यात देशभरात चीन विरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे चिनी मालाचा बहिष्कार करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. यामुळे चिनी बनावटीच्या मालाचा उठाव कमी झाला आहे. रक्षाबंधनाच्या सणाच्यावेळी याचा अनुभव चीनने घेतला असून चिनी व्यापाऱ्यांना चार हजार कोटीचे नुकसान उचलावे लागले होते. त्यानंतर आता स्मार्टफोन बाजारपेठेत चीनच्या ‘शिओमी’ कंपनीला फटका बसला आहे.

सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीत सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात कोरोना साथीच्या काळात बहुतेक फोनची विक्री ऑनलाईन झाली आहे. यामध्ये सॅमसंगचा सर्वाधिक २४ टक्के वाटा होता. तर दुसर्‍या क्रमांकावर ‘शिओमी’ असून या चिनी कंपनीचा भारतीय स्मार्टफोन बाजारात २३ टक्के वाटा आहे. त्याचवेळी विवो १६ टक्के, रिअलमी १५ टक्के, आणि ओप्पोचा वाटा १० टक्के इतका आहे.

पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसर्‍या तिमाहीत चिनी स्मार्टफोन ब्रँडचा हिस्सा ८१ टक्क्यांवरून ७२ टक्क्यांवर आला असल्याचे ‘काउंटरपॉईंट रिसर्च’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी देशातून झालेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीत जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत वर्षाकाठी ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ५ कोटी ३० लाख स्मार्टफोनची निर्यात भारतातून करण्यात करण्यात अली असून भारतीय स्मार्टफोने बाजारात एका तिमाहीत प्रथमच एवढया मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली.

लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने भारतीय स्मार्टफोन बाजाराने पुन्हा गती पकडली असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात सातत्याने वाढ दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये स्वातंत्र्यदिनाच्यावेळी मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली होती. कारण ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात विक्री झाली. गेली काही वर्ष भारतीय बाजारपेठेत सॅमसंग आघाडीवर होती. मात्र कमी किमतीत स्मार्टफोन आणणारी शाओमी कंपनी गेल्या काही वर्षांमध्ये भारतात बरीच लोकप्रिय ठरली. या कंपनीने सलग दोन वर्ष भारतीय मोबाइल बाजारपेठेत सॅमसंग कंपनीला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले होते.

मात्र कंपनीने ऑनलाइन माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अनेक आकर्षक ऑफर्स आणि चीनविरोधी जनमताच फायदा सॅमसंगने करून घेतल्याचे दिसत आहे. त्यातच ‘शिओमी’च्या मोबाईलमधील वेदर ॲपमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत नसल्याने भारतीयांकडून ‘बायकॉट शिओमी’ ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे त्याचा फार मोठा फटका कंपनीला बसू शकतो.

leave a reply