आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांना तोंड देण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज

- अमेरिकेच्या परराष्ट्र प्रवक्त्या

वॉशिंग्टन – ‘भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा देश म्हणून उदयाला आला आहे. अमेरिका सध्या खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देत असून त्याचा मुकाबला आम्ही एकट्याने करू शकत नाही. या आव्हानांवर मात करण्यासाठी भारताची गरज असल्याचे अमेरिकेने ओळखले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या समस्या सोडविण्यासाठी अमेरिकेला भारतासारख्या भागीदारीची गरज आहे’, या शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी पुन्हा एकदा भारताचे महत्त्व अधोरेखित केले. दोन दिवसांपूर्वीच भारत व अमेरिकेदरम्यान 2+2 चर्चा पार पडली असून, त्यानंतर परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत भारताची प्रशंसा करण्यात आली आहे.

भारताची गरज

गेल्या काही वर्षात चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताबरोबरील आपले सामरिक सहकार्य अधिक भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत. भारत व अमेरिकेमध्ये २०१६ साली ‘लिमोआ’ व २०१८ साली ‘कॉमकासा’ करार झाले होते. त्यानंतर अमेरिकेने भारताला ‘मेजर डिफेन्स पार्टनर’चाही दर्जा दिला होता. त्यानंतर आता मंगळवारी झालेल्या 2+2 चर्चेत ‘बीईसीए’सह पाच महत्त्वाचे करार संपन्न झाले. सामरिक सहकार्याबरोबरच व्यापार व तंत्रज्ञान क्षेत्रातही दोन देशांमधील सहकार्य भक्कम होताना दिसत आहे. परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केलेले वक्तव्य त्याला दुजोरा देणारे ठरते.

भारताची गरज

परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मॉर्गन ऑर्टागस यांनी 2+2 बैठकीवर प्रतिक्रिया देताना, भारताचा उल्लेख ‘विशेष भागीदार देश’ असा केला. ‘अमेरिका व भारतातील संबंध राजकीय पक्ष व विचारसरणीपलीकडे जाणारे असून भविष्यातही महत्त्वाचे राहणार आहेत. अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रासह दोन्ही देशांमधील प्रत्येक घटकासाठी द्विपक्षीय सहकार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. अमेरिकेला जगभरात अनेक मित्रदेश व सहकारी आहेत. मात्र भारतासारखे भागीदार असलेले देश मोजकेच आहेत. नुकतीच झालेली 2+2 चर्चा त्याचेच संकेत आहेत’, असे ऑर्टागस म्हणाल्या.

यावेळी अमेरिकी प्रवक्त्यांनी खुल्या व स्वतंत्र इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिका व भारत वचनबद्ध असल्याची ग्वाहीदेखील दिली. सध्या सुरू असलेल्या जागतिक सत्तास्पर्धेच्या काळात ही गोष्ट निर्णायक ठरते, असेही ऑर्टागस यांनी सांगितले.

leave a reply