मस्क यांच्या ‘स्टारलिंक’विरोधातील चिनी नेटवर्कसाठी उपग्रह तयार

- वर्षअखेरीस 30 उपग्रहांच्या प्रक्षेपणाचे संकेत

बीजिंग – अमेरिकेतील आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ कंपनीकडून उभारण्यात आलेल्या ‘स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट नेटवर्क’विरोधात स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची चीनची तयारी पूर्ण झाली आहे. ‘गुआवांग नेटवर्क’ असे याचे नाव असून याअंतर्गत वर्षअखेरीस 30 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. चीनच्या ‘इनोव्हेशन ॲकेडमी फॉर मायक्रोसॅटेलाईटस्‌‍’ या संस्थेकडून या उपग्रहांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचवेळी चिनी संशोधकांकडून ‘स्टारलिंक’मधील उपग्रह भेदण्यासाठी नवे ‘मायक्रोवेव्ह वेपन’ही विकसित करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

मस्क यांच्या ‘स्टारलिंक’विरोधातील चिनी नेटवर्कसाठी उपग्रह तयारमस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ कंपनीने जवळपास तीन हजार छोटे उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. पृथ्वीच्या कक्षेत (लो ऑर्बिट) भ्रमण करणाऱ्या या उपग्रहांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात जलद इंटरनेट सेवा पुरविण्याची क्षमता आहे. ‘स्टारलिंक’ अंतर्गत पृथ्वीच्या कक्षेत जवळपास 40 हजार छोटे उपग्रह सोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना मस्क यांनी आखली आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मस्क यांनी ‘स्टारशिल्ड’ ही नवी योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत अमेरिका सरकारला लष्करी व इतर सुरक्षाविषयक मोहिमांसाठी उपग्रह तयार करून देण्यात येणार आहेत.

एलॉन मस्क यांच्या या नव्या योजनेने अस्वस्थ झालेल्या चीनने उपग्रहांच्या स्वतंत्र नेटवर्कच्या निर्मितीला वेग दिला होता. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांमध्ये ‘स्टारलिंक’ला आव्हान देणाऱ्या उपग्रहांची निर्मिती करण्यात आली असून वर्षअखेरीस ते प्रक्षेपित करण्याची तयारीही झाल्याचे चिनी सूत्रांकडून सांगण्यात आले. ‘गुआवांग नेटवर्क’ अंतर्गत चीन एकूण 12,992 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. या संपूर्ण नेटवर्कवर चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे नियंत्रण राहणार आहे. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियन संरक्षणदलांनी युक्रेनमधील सॅटेलाईट कम्युनिकेशन व इंटरनेट पुरविणारी यंत्रणा उद्ध्वस्त केली होती. त्यावेळी अमेरिकेच्या संरक्षणविभागाने मस्क यांना निर्देश देऊन त्यांच्या ‘स्टारलिंक नेटवर्क’ची सेवा युक्रेनी लष्कराला पुरविण्यास सांगितले होते. त्यासाठी मस्क यांनी आतापर्यंत जवळपास दहा कोटी डॉलर्सहून अधिक निधी खर्च केला आहे. ‘स्टारलिंक’ नागरी क्षेत्रासाठी उभारण्यात आली असली तरी युक्रेनच्या लष्कराने रशियावर हल्ले चढविण्यासाठी याचा प्रभावी वापर केला होता.

हिंदी

leave a reply