खाशोगी हत्येप्रकरणी सौदीने युएनच्या अन्वेषिकेला धमकावले

- सौदीने आरोप फेटाळला

लंडन/दुबई – पत्रकार जमाल खाशोगीच्या हत्येची चौकशी करणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला तपास अधिकारी एग्नेस कॅलॅमर्ड यांना सौदी अरेबियाने धमकावले होते. सौदी अरेबियाच्या मानवाधिकार समितीच्या अधिकार्‍यांनी ही धमकी दिल्याचे कॅलॅमर्ड यांनी ब्रिटनच्या आघाडीच्या वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले. पण कॅलॅमर्ड यांना कुठल्याही प्रकारची धमकी दिली नसल्याचे सौदीच्या मानवाधिकार समितीचे प्रमुख अवाद अलावाद यांनी म्हटले आहे.

२०१८ साली तुर्कीतील सौदीच्या दूतावासाच्या इमारतीत पत्रकार खाशोगी यांची हत्या झाल्याचा आरोप तुर्की तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी खाशोगी यांच्या हत्येचे आदेश दिले व याचे पुरावे असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने याप्रकरणी कॅलॅमर्ड यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. या चौकशीदरम्यान सौदीच्या एका अधिकार्‍याने आपल्याला या तपासातून माघार घेण्याची धमकी दिल्याचा आरोप कॅलॅमर्ड यांनी केला.

दरम्यान, खाशोगी प्रकरणी अमेरिकेने सौदीच्या काही अधिकार्‍यांवर निर्बंध लादले आहेत. पण क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना या निर्बंधातून वगळले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या बायडेन प्रशासनावर टीका होत आहे.

leave a reply