सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सची रशियन राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

क्राऊन प्रिन्सरियाध – सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा पार पडली. युक्रेनच्या युद्धापासून ते आखाती क्षेत्रात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, ही चर्चा जगभरातील विश्‍लेषकांचे लक्ष वेधून घेणारी ठरते. येमेनच्या आखातात अमेरिकन नौदलाची गस्त सुरू होणार असल्याची घोषणा नुकतीच झाली होती. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन व क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्यातील या चर्चेला सामरिक महत्त्व आल्याचे दिसते आहे.

युक्रेनचे युद्ध संपविण्यासाठी राजकीय वाटाघाटीतून मार्ग निघेल, असा विश्‍वास व्यक्त करून त्यासाठी सौदी अरेबिया पूर्णपणे सहकार्य करील, असे या चर्चेत क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाले. त्याचवेळी इंधन उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेकच्या रशियाबरोबरील सहकार्यावर (ओपेक प्लस) देखील दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका ओपेकच्या सदस्यदेशांनी इंधनाचे उत्पादन वाढवावे, अशी मागणी करीत आहे. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर इंधनाचे दर कडाडले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका रशियाच्या इंधन निर्यातीला लक्ष्य करीत आहे. ओपकेने इंधनाचे उत्पादन वाढविले, तर इंधनाच्या दरावर नियंत्रण मिळविणे सोपे जाऊ शकते. यासाठी अमेरिका सौदी तसेच इतर इंधन उत्पादक देशांना आवाहन करीत आहे. पण अमेरिकेची ही मागणी ओपेकेने स्पष्ट शब्दात धुडकावली. त्याचवेळी सौदीने देखील येमेनी बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे आपण इंधनाचे उत्पादन वाढविण्यास असमर्थ असल्याचे अमेरिकेला कळविले आहे.

येमेनमधील हौथी बंडखोरांना बायडेन प्रशासनाने दहशतवाद्यांच्या यादीतून वगळून सौदीला धक्का दिला होता. येमेनी बंडखोरांच्या सौदीविरोधातील आक्रमकतेमागे इराणसह बायडेन प्रशासनाचेही उत्तेजन असल्याचे आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत सौदीने अमेरिकेची मागणी नाकारण्यासाठी पुढे केलेले येमेनी बंडखोरांच्या हल्ल्याचे कारण, अमेरिकेला आरसा दाखविणारे ठरते.

सौदीचे अमेरिकेबरोबरील संबंध अशारितीने ताणलेले असतानाच, अमेरिकेने येमेनच्या आखातातील सुरक्षेसाठी नौदलाची गस्त घालण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयाकडे सौदी तसेच येमेनी बंडखोरांच्या हल्ल्याचे लक्ष ठरणारे इतर आखाती देश संशयाने पाहत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात पार पडलेली चर्चा आखातातील रशियाचा प्रभाव अधिकच वाढत असल्याचे दाखवून देत आहे.

काही दिवसांपूर्वीच, ओपेकने रशियन इंधनाला पर्याय देता येणार नाही, असे अमेरिकेला बजावले होते. त्यानंतर अमेरिकी नौदलाने केलेली गस्तीची घोषण व रशियन राष्ट्राध्यक्ष आणि सौदीच्या क्राऊन प्रिन्स यांच्यात झालेली चर्चा आखाती क्षेत्रात नव्या उलथापालथींचे संकेत देत आहे.

leave a reply