उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या क्षेपणास्त्रांची चाचणी

अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमतासेऊल – उत्तर कोरियाने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या नव्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. शनिवारी संध्याकाळी ही चाचणी केली असून दोन्ही क्षेपणास्त्रे सागरी क्षेत्रात कोसळल्याचे दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आले. या वर्षात उत्तर कोरियाकडून करण्यात आलेली ही १२वी क्षेपणास्त्र चाचणी ठरते. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांची बहिण किम यो यांनी, उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांनी दक्षिण कोरियाच्या हल्ल्याला उत्तर देईल, असे धमकावले होते. या पार्श्‍वभूमीवर ही चाचणी महत्त्वाची ठरते.

काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांच्या ‘बर्थ ऍनिव्हर्सरी’च्या निमित्ताने राजधानी प्योनग्यँगमध्ये मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या सोहळ्यात लष्करी संचलन व शस्त्रांचा समावेश नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमे तसेच विश्‍लेषकांनी आश्‍चर्यही व्यक्त केले होते. गेल्या महिन्यात उत्तर कोरियाची महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र चाचणी अपयशी ठरल्याने लष्करी संचलन टाळण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, असे सांगण्यात येत होते. गेल्या महिन्यातील अपयशानंतर उत्तर कोरिया काही महिने क्षेपणास्त्र चाचण्या थांबवेल, असे दावेही करण्यात आले होते. मात्र या दाव्यांना धक्का देत शनिवारी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे.

उत्तर कोरियातील सरकारी वृत्तसंस्था तसेच दैनिकाने चाचणीची माहिती व फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन या चाचणीसाठी उपस्थित असल्याचे त्यात दाखविण्यात आले आहे. ही चाचणी ‘टॅक्टिकल गायडेड वेपन सिस्टिम’ असल्याचा दावा सरकारी वृत्तसंस्थेने केला. उत्तर कोरियाची अण्वस्त्रे व दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची क्षमता वाढविण्यासाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे यात सांगण्यात आले. उत्तर कोरियाने प्रसिद्ध अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमताकेलेल्या या माहितीनंतर, येत्या काही दिवसात हा देश कदाचित नव्या अण्वस्त्राची चाचणी घेऊ शकतो असा अंदाज विश्‍लेषक तसेच तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांकडे दुर्लक्ष करणे अतिशय चुकीचे ठरेल, असा दावा दक्षिण कोरियातील विश्‍लेषक तसेच जपानची माध्यमे करीत आहेत. गेल्या चार महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने १२ क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. यामध्ये लघू ते दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्याचबरोबर उत्तर कोरियाने मोबाईल लॉंचर आणि पाणबुडीतूनही क्षेपणास्त्रांची चाचणी करून आपली सज्जता दाखवून दिली, असा दावा दक्षिण कोरियन विश्‍लेषक करीत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीलाच, उत्तर कोरियापासून अमेरिका आणि अमेरिकेच्या सहकारी देशांना खर्‍या अर्थाने धोका असल्याचे अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी बजावले होते. तर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी, उत्तर कोरियापासून अमेरिकेला कायमस्वरुपी धोका असल्याचा इशारा दिला होता.

leave a reply