उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिकेने चीनला जाब विचारायला हवा

- माजी सल्लागार बोल्टन यांची मागणी

वॉशिंग्टन – ‘गेली अनेक वर्षे चीन उत्तर कोरियाच्या मुद्यावर टाळाटाळ करीत आहे व यासाठी अमेरिका जबाबदार आहे. मात्र पुढील काळात अमेरिकेने चीनसंदर्भातील धोरण बदलण्याची गरज असून उत्तर कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्याच्या मुद्यावर बायडेन प्रशासनाने चीनला जाब विचारायला हवा’, अशी मागणी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केली आहे. गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांनी, आपला देश अमेरिकेवर थेट क्षेपणास्त्र हल्ला चढवून जगाला हादरवून सोडू शकतो, अशी धमकी दिली होती.

जानेवारी महिन्यापासून उत्तर कोरियाने सात फेर्‍यांमध्ये निरनिराळ्या टप्प्यांच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. यामध्ये लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपासून बॅलेस्टिक तसेच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा समावेश असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. त्याचबरोबर पाणबुडीतून मारा करू शकणार्‍या क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचेही उत्तर कोरियन राजवटीने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यापाठोपाठ गेल्याच आठवड्यात आपल्याकडे हायड्रोजन बॉम्ब, आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे असा शस्त्रसाठा असल्याचेही उत्तर कोरियाने सांगितले होते.

या पार्श्‍वभूमीवर माजी सुरक्षा सल्लागार बोल्टन यांनी बायडेन प्रशासनाला धारेवर धरले आहे. उत्तर कोरियाकडील आंतरखंडीय क्षेपणास्त्रे हा सध्या अमेरिकेला असलेला मोठा धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम व क्षेपणास्त्र साठा यावर तोडगा काढण्यासाठी बायडेन प्रशासनाकडे फारसे पर्याय उरले नसल्याची टीकाही केली.

२०१७ सालापासून उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा वेग मंदावला होता, असा दावा अमेरिकी माध्यमांनी केला होता. पण गेल्या वर्षी अमेरिकेत बायडेन यांचे प्रशासन सत्तेवर आल्यानंतर उत्तर कोरियाचा विश्‍वास वाढला असून त्यांनी एकामागोमाग एक अशा क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावल्याचे अमेरिकी माध्यमे लक्षात आणून देत आहेत. बोल्टन यांनी केलेली वक्तव्ये त्याला दुजोरा देणारी ठरतात.

leave a reply