तैवानसह इतर मुद्यांवरून तणाव चिघळत असतानाच अमेरिका व चीनच्या वरिष्ठ नेत्यांची युरोपात बैठक

व्हिएन्ना/वॉशिंग्टन/बीजिंग – तैवानला करण्यात येणारा शस्त्रपुरवठा, रशिया-युक्रेन युद्ध, आर्थिक निर्बंध, सेमीकंडक्टर्स यासारख्या विविध मुद्यांवरून संबंध चिघळले असतानाच अमेरिका व चीनच्या वरिष्ठ नेत्यांची युरोपात बैठक झाल्याचे उघड झाले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे चीनमधील राजदूत निकोलस बर्न्स यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांची भेट घेतली होती. त्यानंतर युरोपच्या व्हिएन्ना शहरात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन व चीनचे परराष्ट्र धोरण सल्लागार वँग यी यांनी परस्परांची भेट घेतली. यावेळी अमेरिका व चीनचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. ही बैठक होत असतानाच चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग युरोप दौऱ्यावर दाखल झाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

तैवानसह इतर मुद्यांवरून तणाव चिघळत असतानाच अमेरिका व चीनच्या वरिष्ठ नेत्यांची युरोपात बैठकगेल्या काही वर्षांपासून अमेरिका व चीनमधील तणाव सातत्याने वाढत असून त्यात नवनव्या मुद्यांची भर पडत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात तैवान, ५जी, कोरोनाची साथ, सायबरहल्ले, हेरगिरी यासारख्या मुद्यांवरून चीनबरोबरील मतभेद तीव्र होण्यास सुरुवात झाली होती. ट्रम्प यांनी चीनविरोधात सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे दोन देशांमधील संबंध अधिकच बिघडले. त्यानंतर आलेल्या ज्यो बायडेन यांनी चीनविरोधातील आक्रमक धोरण कायम ठेवण्याचे संकेत दिले असले तरी प्रत्यक्षात बायडेन प्रशासन चीनसंदर्भातील भूमिका सौम्य करण्यावरच भर देत असल्याचे दिसत आहे.

फेब्रुवारी महिन्यात चीनचे स्पाय बलून्स अमेरिकी हद्दीत आढळल्यानंतर दोन देशांमधील संबंध चिघळले होते. त्यातच तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी अमेरिकेला दिलेली धावती भेट व त्यात अमेरिकी संसदेच्या सभापतींबरोबर झालेली चर्चा यामुळे चीन खवळला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांचा चीन दौरा रद्द करण्यात आला होता. अमेरिकेबरोबरील राजनैतिक तसेच आर्थिक सहकार्य कमी करण्याचा इशाराही चीनकडून देण्यात आला होता. त्यानंतरही अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने चीनबरोबर पुन्हा एकदा बोटचेपे धोरण स्वीकारल्याचे गेल्या काही दिवसांमधील घटनांवरून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी चीनबाबत सकारात्मक व रचनात्मक सहकार्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यानंतर अमेरिकेने ‘स्पाय बलून’ प्रकरणावरून घेतलेला आक्रमक पवित्रा सौम्य करीत असल्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी अमेरिकेचे चीनमधील राजदूत बर्न्स यांनी चिनी परराष्ट्रमंत्र्यांची घेतलेली भेट आणि आता युरोपात दोन्ही देशांमध्ये झालेली उच्चस्तरिय बैठक बायडेन प्रशासन चीनबरोबरील संबंध नॉर्मल करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे संकेत देणारी ठरते.

हिंदी English

 

leave a reply