लिबियात अपहरण झालेल्या सात भारतीयांची सुटका

त्रिपोली – लिबियातून दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या सात भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ट्युनिशियामधील भारतीय राजदूत पुनित रॉय कुंडल यांनी याबाबत माहिती जाहीर केली. गेल्या २५ दिवसापासून हे भारतीय दहशतवाद्यांच्या ताब्यात होते.

सात भारतीयांची सुटका

१४ सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी या सात भारतीयांचे त्रिपोली विमानतळावर जात असताना अश्वरीफ भागामधून अपहरण केले होते. या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते. नुकतीच याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली होती. या भारतीयांच्या सुटकेसाठी ट्युनिशियातील दूतावासाकडून लिबियन सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनाशी सातत्याने संपर्क साधण्यात येत होता.

लिबियात भारतीय दूतावास नसल्याने शेजारील देश ट्युनिशियातील भारतीय राजदूताकडे या भारतीयांच्या सुटकेसाठी लिबियन यंत्रणांशी संपर्कात राहण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अखेर सोमवारी या सात भारतीयांची सुटका करण्यात आली. अपहरण झालेले भारतीय आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत.

लिबियात गद्दाफी राजवट २०११ साली कोसळल्यापासून येथे अस्थिर परस्थिती असून गृहयुद्ध पेटलेले आहे. भारताने नौदल आणि वायुसेनेच्या मदतीने २०११ साली लिबीयातील भारतीयांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन सेफ होमकमिंग’ राबविले होते आणि हजारो भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले. मात्र यानंतरही सुमारे तीन हजार भारतीय स्वइच्छेने लिबियातच थांबले होते. २०१५ सालानंतर लिबियातील परिस्थिती अधिकच बिघडल्यावर भारताने लिबियात जाण्यासाठी प्रवासी निर्बंध लादलेले आहेत.

leave a reply