बलोचिस्तानमधील हल्ल्यात सात पाकिस्तानी जवानांचा बळी

क्वेट्टा – बलोचिस्तानमधील लष्करी चौकीवर झालेल्या हल्ल्यात सात पाकिस्तानी जवानांचा बळी गेला आहे. राजधानी क्वेट्टापासून सुमारे १७० किलोमीटर दूर असलेल्या हरनाईमधील पोस्टवर बंडखोर गटाने केलेल्या हल्ल्यात ‘फ्रंटिअर कॉर्प्स’चे सहा जवान गंभीर जखमी झाले असून दोन खाजगी सुरक्षारक्षक मारले गेल्याचेही सांगण्यात येते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याची निंदा केली असून परकीय शक्तींकडून समर्थन मिळालेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

सात पाकिस्तानी

गेल्याच आठवड्यात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या एका कारवाईत बलोचिस्तानमधील १० बंडखोरांचा बळी गेला होता. रविवारी पहाटे चढविलेला हल्ला पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईला दिलेले प्रत्युत्तर असल्याचे मानले जाते. हरनाई भागात पाकिस्तानच्या लष्कराची चौकी असून त्यावर ‘फ्रंटिअर कॉर्प्स’सह खाजगी सुरक्षारक्षक तैनात आहेत. या चौकीवर बलोच बंडखोरांनी अचानक हल्ला चढविला. यावेळी झालेल्या संघर्षात ‘फ्रंटिअर कॉर्प्स’च्या सात जवानांसह दोन खाजगी सुरक्षारक्षकांचा बळी गेला. यावेळी सहा जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

सात पाकिस्तानी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व शिक्षणमंत्री शफकात महमूद यांनी जवानांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतानाच हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली. पंतप्रधान इम्रान खान यांनी यामागे परकीय शक्तीचे समर्थन मिळालेल्या दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानी लष्कराने हल्ला झालेल्या भागात शोधमोहीम सुरू असल्याची माहिती दिली आहे.

गेल्या तीन महिन्यात बलोचिस्तानमध्ये तैनात पाकिस्तानी लष्करावर झालेला हा दुसरा मोठा हल्ला ठरला आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या हल्ल्यात ‘फ्रंटिअर कॉर्प्स’च्या आठ जवानांसह १५ जणांचा बळी गेला होता. हा हल्ला ‘बीआरएएस’ या बंडखोर संघटनेने घडविला होता. बलोचिस्तान स्वतंत्र होईपर्यंत पाकिस्तानी लष्करावर हल्ले होत राहतील, असा इशाराही या संघटनेने दिला होता.

बलोचिस्तानमध्ये ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’च्या (सीपीईसी) माध्यमातून चीनने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीबरोबरच चिनी नागरिक व अधिकार्‍यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याविरोधात बलोची जनतेत तीव्र असंतोष आहे. त्यामुळे बलोच बंडखोर गटांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून चिनी कंपन्या व कर्मचार्‍यांबरोबरच त्यांना सुरक्षा पुरविणार्‍या पाकिस्तानी यंत्रणांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

leave a reply