अमेरिका-इराणमधील अणुकराराला इस्रायल विरोध केल्यावाचून राहणार नाही

जेरूसलेम – येत्या काही दिवसात अणुकरार होणार असल्याचे संकेत अमेरिका व इराण देत आहेत. इराणने अधिक गंभीरपणे प्रयत्न केले तर लवकरच हा करार मार्गी लागेल, असे बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. पण हा करार संपन्न झाल्यास त्याचा कडाडून विरोध करण्याची तयारी इस्रायलने केली आहे. सध्या म्युनिक येथे सुरू असलेल्या सुरक्षा परिषदेत इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ या अणुकराराबाबत इस्रायलची भूमिका मांडू शकतात, असा दावा केला जातो.

अमेरिका आणि इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी व्हिएन्ना येथील बैठकीत अणुकरार मार्गी लागणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. या वाटाघाटींमध्ये लक्षणीय प्रगती झाली असून पुढील काही दिवसांमध्ये अणुकरार शक्य असल्याचे बायडेन प्रशासन ठामपणे सांगत आहे. त्याचबरोबर या अणुकरारासाठी अमेरिका व इराणमध्ये आपल्या मागण्यांवर चर्चा पार पडल्याची बातमीही समोर आली होती.

व्हिएन्ना येथील बैठकीत सुरू असलेल्या घडामोडी आणि अमेरिका व इराणने दिलेल्या प्रतिक्रियांवर इस्रायलने कुठलीही घोषणा केलेली नाही. पण इस्रायली माध्यमांनी सरकारी सूत्रांच्या हवाल्याने या अणुकरारावर इस्रायल कडाडून विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट अणुकरारात प्रस्तावित झालेल्या मागण्यांवर आपला आक्षेप नोंदविणार आहे.

२०१५ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्यात अणुकरार झाला होता. पण इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यात हा अणुकरार अपयशी ठरल्याचे उघड झाले होते. अणुकरारा करून पाश्‍चिमात्य देशांकडून सवलत घेणार्‍या इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग वाढविला होता. तसेच आपल्या अणुकार्यक्रमात मोठी प्रगती केली होती. यांचा दाखला देऊन इस्रायल सदर अणुकराराला विरोध करणार आहे.

गेल्या सात वर्षांमध्ये इराणने अणुकार्यक्रमात केलेली प्रगती पूर्वपदावर नेली जाईल का, असा सवाल इस्रायल बायडेन प्रशासनाला विचारू शकते. तसेच या नव्या अणुकराराने इराणचा अणुकार्यक्रम रोखण्याची हमी मिळेल का, असा खरमरीत सवाल इस्रायल सरकार करणार असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

सध्या जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरक्षाविषयक परिषदेचे आयोजन केले आहे. यासाठी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ हजर राहणार असून ते इराणपासून संभवणार्‍या धोक्याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला सावध करणार असल्याचा दावा केला जातो.

leave a reply