लडाखच्या एलएसीवरील धोका टळला, पण संपलेला नाही

- लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे

नवी दिल्ली – ‘लडाखच्या एलएसीवरील तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. भारत व चीनचे सैन्य २०२० सालच्या एप्रिल महिन्यात होते, त्या स्थितीत गेल्याखेरीज इथे सारे काही सुरळीत झाले, असा दावा करता येऊ शकत नाही’, असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी ठासून सांगितले. पण देशाच्या एक इंच भूभागावरही चीनचा ताबा नाही, असे सांगून जनरल नरवणे यांनी याबाबत देशाला आश्‍वस्त केले. त्याचवेळी फिलिपाईन्ससारख्या छोट्या देशाच्या सागरी क्षेत्रात दोनशेहून अधिक जहाजे घुसविणारा चीन एकतर्फी कारवाई करून सीमेत फेरफार करण्याचा प्रयत्न वारंवार करीत आहे, याकडे लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले. याद्वारे चीनवर विश्‍वास ठेवता येणार नाही, असा संदेश जनरल नरवणे यांनी दिला आहे.

एका खाजगी वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना जनरल नरवणे यांनी लडाखच्या एलएसीवरील परिस्थिती तसेच भारत-चीन सीमावादाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. लडाखच्या एलएसीवर तणाव नक्कीच कमी झालेला आहे. इथून सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. जोवर दोन्ही देशांचे सैन्य २०२० सालच्या एप्रिल महिन्यात होते, त्या स्थितीत जात नाही, तोपर्यंत इथला तणाव पूर्णपणे निवळल्याचा दावा करता येणार नाही. इथला धोका टळला असला, तरी संपलेला नाही, असे लष्करप्रमुखांनी बजावले आहे. भारत चीनशी लष्करी तसेच राजनैतिक पातळीवर चर्चा करीत असून या प्रत्येक स्तरावरील चर्चेत भारत हीच मागणी उचलून धरत आहे, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

असे असले तरी लडाखच्या एलएसीवरील भारताच्या भूमीवर चीनचा ताबा नाही, असे लष्करप्रमुखांनी ठासून सांगितले. मात्र चीनबरोबरील सीमेची आखणी झालेली नाही, त्यामुळे यासंदर्भात फार मोठी अस्पष्टता आहे, याची जाणीव जनरल नरवणे यांनी करून दिली. त्याचवेळी भारताला चीनवर विश्‍वास ठेवता येणार नाही, असा संदेश जनरल नरवणे यांनी यावेळी दिला. फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात चीनने आपली दोनशेहून अधिक जहाजे पाठवून घुसखोरी केली आहे. आपल्या तुलनेत अतिशय छोट्या असलेल्या देशांच्या विरोधात अशी घुसखोरी करून त्यांना भुईसपाट करण्याचा चीनचा प्रयत्न असतो, याकडे जनरल नरवणे यांनी लक्ष वेधले.

अशा एकतर्फी कारवाया करून सीमेत बदल करण्याचे चीनचे धोरण आत्मसन्मान असलेला कुठलाही देश स्वीकारणार नाही. सर्वच देशांना चीनच्या या आक्रमक कारवायांच्या धोक्याची जाणीव झालेली आहे आणि ते याविरोधात एकजूट करीत आहेत, असे सूचक उद्गार जनरल नरवणे यांनी काढले. मात्र भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांची क्वाड संघटना चीन किंवा अन्य कुठल्याही देशाविरोधात नसल्याचा निर्वाळा लष्करप्रमुखांनी दिला.

दरम्यान, काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर शांतता असून सध्या इथला गोळीबार थांबलेला आहे, असे सांगून जनरल नरवणे यांनी याचे स्वागत केले. पण गोळीबार सुरू नसला, तरी पाकिस्तानने काश्मीरच्या एलओसीपलिकडील दहशतवाद्यांचे तळ कायम ठेवलेले आहेत, असे जनरल नरवणे म्हणाले. सध्या पाकिस्तानची अवस्था बिकट बनली आहे. एफएटीएफच्या कारवाईच्या धास्तीने पाकिस्तानला ग्रासले आहे. त्याचवेळी अंतर्गत पातळीवरही पाकिस्तानला फार मोठी आव्हाने मिळत आहेत. यामुळे पाकिस्तानला भारताशी चर्चा करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे लष्करप्रमुखांनी परखडपणे स्पष्ट केले.

leave a reply