इराणकडील २० टक्के संवर्धित युरेनियमचा साठा १२० किलोवर

संवर्धिततेहरान – इराणकडे २० टक्के क्षमतेच्या संवर्धित युरेनियमचा १२० किलोग्रॅम इतका साठा आहे, अशी घोषणा इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी केली. त्याचबरोबर कराज येथील अणुप्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेराज्ची आवश्यकता नसल्याचे सांगून इस्लामी यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची मागणी फेटाळली. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीपेक्षा इराणने अधिक प्रमाणात संवर्धित युरेनियमचा साठा जमा केल्याचे इस्लामी यांच्या घोषणेतून उघड होत आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या आर्थिक निर्बंधांवर संताप व्यक्त करून इराणच्या संसदेने काही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या सूचनेवर चालणार्‍या या संसदेने इराणच्या अणुकार्यक्रमाचा वेग वाढविण्याचे आदेश अणुऊर्जा आयोगाला दिले होते. इराणने युरेनियम २० टक्क्यांपर्यंत संवर्धित करावे. तसेच या संवर्धित युरेनियमचा साठा १२० किलोपर्यंत असावा, असे आदेश इराणच्या संसदेने दिले होते.

त्यानुसार इराणने काही महिन्यांपूर्वीच अणुप्रकल्पातील युरेनियम २० टक्क्यांपर्यंत संवर्धित केले. तर संवर्धित युरेनियमचा १२० किलोचा साठा सध्या आपल्याकडे असल्याचे इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख इस्लामी यांनी दोन दिवसांपूर्वी सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. इराणच्या संसदेने डिसेंबरपर्यंत १२० किलोची मर्यादा गाठण्याचे आदेश दिले होते. पण त्याआधीच इराणच्या शास्त्रज्ञांनी आपल्या समोरील उद्दिष्ट पूर्ण केले असून डिसेंबरपर्यंत यात आणखी वाढ होईल, असे इस्लामी म्हणाले.

संवर्धितइराणची ही घोषणा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे दावे खोडून टाकणारी ठरते. कारण इराणकडे २० टक्के संवर्धित युरेनियमचा ८४ किलो साठा असल्याचे आयोगाने गेल्या महिन्यातील आपल्या अहवालात म्हटले होते. मे महिन्यात हाच साठा ६३ किलो इतका असल्याचा दावा आयोगाने केला होता. अशा परिस्थितीत अवघ्या महिन्याभरात इराणच्या अणुकार्यक्रमाने ज्या वेगाने २० टक्के संवर्धित युरेनियमचा साठा केला, ते पाहता इराणकडे प्रगत तंत्रज्ञान असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

२०१५ सालच्या अणुकरारानुसार, इराणला युरेनियमचे संवर्धन ३.६७ टक्क्यांपर्यंत ठेवणे बंधनकारक होते. पण इराणने युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत वाढवून अणुकराराचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. तर सहा वर्षांपूर्वीच्या करारानुसार, पाश्‍चिमात्य देशांनी इराणला आवश्यक अणुइंधन तसेच आर्थिक व इतर सहाय्य पुरविलेले नाही. त्यामुळे पाश्‍चिमात्य देशांनीच अणुकराराच्या मर्यादेचा भंग केला, असा ठपका इस्लामी यांनी ठेवला.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे इराण कराज अणुप्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेराज् बसविणार नसल्याचे इस्लामी यांनी ठणकावले. गेल्या काही महिन्यांमध्ये इराणच्या अणुप्रकल्पांमध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटांबाबत आयोग ठाम भूमिका घेणार नसेल, तर इराण देखील सहकार्य करणार नसल्याचे इस्लामी यांनी बजावले. नातांझ व इतर अणुप्रकल्पांमध्ये झालेल्या घातपाती हल्ल्यांसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा ठपका इराणने ठेवला आहे. तसेच अणुऊर्जा आयोगाने इस्रायलविरोधात कारवाई करावी, अशी मागणी इराणने केली होती.

leave a reply