नेपाळच्या पथकावर चिनी सैनिकांकडून अश्रुधुराचा मारा

काठमांडू – नेपाळच्या हुमला जिल्ह्यात सीमा निश्चित करणाऱ्या पिलरची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नेपाळी पथकावर चिनी सैनिकांनी अश्रुधुराच्या नळकांड्या डागल्या. नेपाळ सरकार चीनने आपल्या भूभागावर कब्जा केल्याचे दावे फेटाळत आली आहे. मात्र नेपाळी माध्यमे आणि विरोधी पक्ष नेपाळ सरकार सत्य लपवत असल्याचे आरोप करत आहेत. याबाबत निरनिराळी माहिती सातत्याने पुढे येत आहे. हुमला जिल्ह्यातच चीनने अतिक्रमण केलेल्या भागावर काही दिवसातच इमारतीही उभ्या केल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर नेपाळच्या पथकावर चीनकडून अश्रूधुरांचा मारा केल्याचे वृत्त समोर आल्याने पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे सरकार अधिकच अडचणीत आले आहे.

चीनच्या प्रभावाखाली काम करणारे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरकार भारताने आपल्या भूभागावर कब्जा केल्याचे खोटे दावे सातत्याने करत आहे. यासाठी नेपाळ सरकारने एक राजकीय नकाशाही प्रसिद्ध केला. मात्र त्याचवेळी नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये चीनने कब्जा केलेल्या भूभागाबाबत नेपाळ सरकारकडून अवाक्षरही काढले जात नसल्याचे समोर आले होते. नेपाळच्या कृषी विभागाच्या एका अहवालातूनच चीन हळूहळू सीमा भागातील गावांच्या जमिनी बळकावत असल्याचे समोर आले होते. यासाठी चीनकडून नद्यांचे मार्ग बदलण्यात येत असून बॉर्डर पिलर पुढे सरकाविण्यात येत असल्याचा उल्लेखही अहवालात होता.

मात्र नेपाळ सरकारकडून चीन बळकावत असलेल्या या जमिनीबाबत सत्य लपविण्यासाठी बरीच कसरत चालू आहे. नेपाळचा सीमावाद हा भारताबरोबर आहे, चीनबरोबर नाही, असे नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते. भारतीय माध्यमे खोट्या बातम्या पसरवित असल्याचे आरोपही नेपाळने लावले होते. प्रत्यक्षात नेपाळी स्थानिक माध्यमांमधूनच चीनने बळकावलेल्या या भूभागाविषयी निरनिराळी माहिती समोर येत आहे. याविरोधात नेपाळी जनतेमध्ये ओली सरकारवरील असंतोष वाढत असून सात्यत्याने आंदोलनेही होत आहेत. विरोधीपक्षही याबाबत ओली सरकारला जाब विचारत आहेत.

आता हुमला जिल्ह्यात बॉर्डर पिलरची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकावर चिनी सैनिकांनी अश्रुधुरांचा मारा केल्याचे वृत्त उघड झाले आहे. चिनी अतिक्रमणाबाबतचे सत्य जाणून घेण्यासाठीच हे पथक येथे पोहोचले होते. या १९ सदस्सीय पथकाचे नेतृत्व नेपाळच्या काँग्रेस पक्षाचे नेते जीवन बहादुर शाही करीत होते. त्यामुळे या प्रकरणावरून आता नेपाळ सरकार अधिकच अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. येथील नामखा गावचे उपाध्यक्ष चिनी सैनिकांनी केलेल्या अश्रुधुरांच्या नळकांड्यांच्या माऱ्यात जखमीही झाले आहेत.

दरम्यान, नेपाळच्या हुमला जिल्ह्यात बळकावलेल्या जमिनीवर चीनने काही दिवसातच नऊ इमारती उभारल्याची माहिती गेल्या महिन्यात उघड झाली होती. तसेच या भागात नेपाळी नागरिकांना येण्यासही चीनने मनाई केल्याचे वृत्त आहे. येथील एका स्थानिक सरपंचाने लांबून चीनच्या या बांधकामाचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले होते. चीन धार्जिणे नेपाळ सरकार जाणूनबुजून चीनच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहेत. चीनने अतिक्रमण केलेला हा नेपाळचा भूभाग भारताच्या उत्तराखंडमधील पिठोरागड येथील सीमापासून केवळ ७० किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे भारतासाठीसुद्धा ही चिंता वाढविणारी बाब ठरते.

leave a reply