अरुणाचल प्रदेशच्या तवांगपर्यंत ऑल वेदर कनेक्टिव्हिटीसाठी उभारण्यात येणार्‍या ‘सेला टनेल’च्या उत्खननाचे काम पूर्ण

नवी दिल्ली – अरुणाचलच्या तवांगचा हिवाळ्यातील प्रचंड हिमवर्षावातही संपर्क ठप्प होऊ नये यासाठी लष्कराच्या ‘बॉर्डर रोड ऑर्गनयझेशन’द्वारे (बीआरओ) बांधणी करण्यात येत असलेल्या ‘सेला टनेल’च्या उत्खननाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षात १३ हजार ८०० फूट उंचीवरील हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होईल, अशी शक्यता आहे. यामुळे सीमेपर्यंत लष्करी साहित्य व जवानांची वाहतूक वेगाने करणे शक्य होईल. १९६२ भारत-चीन युद्धात चीनने सेला ताब्यात घेतल्यानंतरच युद्धाची स्थिती बदलली होती. यावरून या बोगद्याचे व्यूहरचनात्मक महत्त्व अधोरेखित होईल.

चीन अरुणाचल प्रदेशच्या मोठ्या भूभागावर सतत दावा करीत आला आहे. तवांग व इतर काही भागाचा दक्षिण तिबेट असा उल्लेख करणार्‍या चीनने एक दिवस आधीच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेश दौर्‍यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते ‘सेला टनेल’च्या उत्खननाच्या कामात करण्यात येणार्‍या शेवटच्या स्फोटाची कळ दाबण्यात आली. याद्वारे चीनला एकप्रकारे संदेश देण्यात आला आहे.

भारताने चीनला लागून असलेल्या सर्वच सीमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रकल्प हाती घेतले आहे. रस्ते व रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहेत. तसेच जुन्या बंद धावपट्ट्याही पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहेत. गेल्यावर्षी लडाखमध्ये चीनने केलेली घुसखोरी, त्यानंतर गलवानमध्ये भारतीय सैनिक व चीनच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षानंतर या पायाभूत सुविधांच्या कामांना अधिकच गती देण्यात आली आहे. सेला बोगद्याचे कामही वेगाने सुरू आहे.

सेला टनेल हा बोमडिला-तवांग या १७१ किलोमीटरच्या राष्ट्रीय मार्गाचा भाग असून या भुयारी मार्गाच्या उभारणीमुळे तवांगपर्यंत कोणत्याही वातावरणात वेगाने पोहोवणे शक्य होईल. सेला पास हा अरुणाचल प्रदेशच्या पश्‍चिम कामेंग, पूर्व कामेंग आणि तवांग या तीन जिल्ह्यांना भारताच्या इतर भूभागाशी जोडतो. यातील पश्‍चिम कामेंगच्या या सीमा या तिबेटबरोबर भूतानशी जोडलेल्या आहेत. तर पूर्व कामेंग आणि तवांगच्या सीमा या तिबेटशी भिडलेल्या आहेत. यावरून सेला पास भागाचे व्यूहरचनात्मक महत्त्व लक्षात येईल.

१९६२ च्या चीनच्या आक्रमणातही सेला ताब्यात घेतल्यावर चीन अरुणाचल प्रदेशमध्ये पुढे सरकू शकला होता, हे येेथे नमूद करावे लागेल. तिबेट आणि भूतानच्या सीमेपर्यंत आपत्कालीन काळात कमी वेळात पोहोचता यावे, तसेच हिवाळ्यातही अतिहिमवृष्टीतही या भागाचा संपर्क तुटला जाऊ नये यासाठी हा ऑल वेदर रोड महत्त्वाचा ठरणार आहे. सेला बोगदा तिबेट व भूतान सीमेपर्यंत ऑल वेदर कनेक्टिव्हीटी देणार ठरणार आहे. याशिवाय आसाममधील तेजपूर येथील लष्कराच्या ४ कोरच्या मुख्यालयापर्यंत पोहोचण्याचा वेळही कमी होणार आहे.

सेला पासच्या ठिकाणी दोन बोगदे बनविले जात असून गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या सेला पास येथील मुख्य बोगद्याच्या उत्खननातील अखेरचा स्फोट कळ दाबून घडविला. हा बोगदा १७९० मीटर लांबीचा आहे. तसेच येथून जवळच आणखी ४५० मीटर लांबीचा बोगदाही बनवून तयार करण्यात आला आहे. याशिवाय ९८० मीटर लांबीचा एका आपत्कालीन भुयारी मार्गही तयार करण्यात आला आहे. त्याचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत सेला टनेल वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा केला जातो. लडाख, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड अशा राज्यांमध्ये सीमेलगत भारताकडून अशाच काही ऑल वेदर रोडचे, ऑल वेदर कनेक्टिव्हिटी देणार्‍या बोगद्यांचे काम सुरू आहे.

leave a reply