‘रुस्तम-२’ ड्रोनची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली – ‘संरक्षण संशोधन विकास संस्था’ने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘रुस्तम-२’ या ड्रोनची उड्डाण चाचणी शुक्रवारी पार पडली. कर्नाटकच्या चित्रदुर्गामध्ये १६ हजार फूट उंचीवरून सलग आठ तास उड्डाण करून ‘रुस्तम-२’ने आपली क्षमता सिद्ध केली. वर्षाखेरीपर्यंत ‘रुस्तम-२’ ड्रोनचे प्रोटोटाईप २६ हजार फूट उंचीवर सलग १८ तास उड्डाण करण्याची क्षमता प्राप्त करेल. यादृष्टीने काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. चीनबरोबरील तणावानंतर भारताने ‘रुस्तम-२’ विकसित करण्याच्या प्रकल्पाला वेग दिला आहे.

‘रुस्तम-२’ ड्रोन ‘सिंथेटिक अपर्चर रडार’, ‘इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टीम’, ‘सिच्युएशनेल अवरनेस सिस्टीम’ने सुसज्ज आहे. या ड्रोनमध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन लिंक आहे. युद्धकाळात ती उपयुक्त ठरेल, असा दावा केला जातो. शुक्रवारी ‘रुस्तम-२’ ड्रोनने आठ तास यशस्वी उड्डाण केल्यानंतर एक तास पुरेल इतके इंधन शिल्लक राहिल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकांऱ्यानी दिली.

भारतीय संरक्षण दलांच्या ताफ्यात असलेल्या इस्रायली बनावटीचे ‘हेरॉन’ ड्रोन शस्त्रसज्ज केली जात आहेत. त्यांच्यावर लेसर गायडेड बॉम्ब बसविण्यात येत आहेत. ‘हेरॉन’ ड्रोनमध्ये सुधारणा करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचवेळी ‘रुस्तम’ ड्रोनवर वेगाने काम सुरु आहे. ‘हेरॉन’ ड्रोनला टक्कर देईल अशा क्षमतेचे ‘रुस्तम’ ड्रोन विकसित करण्याचा ‘डीआरडीओ’चे लक्ष्य आहे.

‘हेरॉन’ ड्रोन वायुसेना आणि नौदलात तैनात आहेत. येत्या काळात ‘रुस्तम-२’च्या आणखी चाचण्या पार पडतील आणि लवकरात लवकर ‘रुस्तम-२’ भारतीय संरक्षणदलांच्या ताफ्यात सामील केले जाईल. यामुळे भारताच्या ‘ड्रोन’ पॉवरमध्ये वाढ होईल. चीन आपली ड्रोन युद्धाच्या क्षमता वाढविली आहे. त्यामुळॆ चीनला या आघाडीवर मात देण्यासाठी भारताने झपाट्याने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ‘रुस्तम’ ड्रोन प्रकल्पाला देण्यात आलेले पुनर्जीवन याचाच भाग ठरतो, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

leave a reply