ईशान्य भारतातील अतिरेकी सुरक्षादलांवर हल्ले चढविण्याच्या तयारीत

- सुरक्षा यंत्रणांचा इशारा

नवी दिल्ली – ‘नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड- खापलांग’ (एनएससीएन-के) या संघटनेसह हिंसेचा मार्ग सोडण्यास तयार नसलेले ईशान्य भारतातील काही अतिरेकी गट म्यानमारमध्ये एकत्र आले आहेत. हे अतिरेकी भारतीय सुरक्षादलांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्यानमारचा दौरा केला होता. या दौऱ्यात उभय देशांमध्ये ईशान्य भारत आणि म्यानमारमधल्या अतिरेकी संघटनांविरोधात संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय झाल्याच्या बातम्या आहेत.

ईशान्य भारत आणि म्यानमारच्या सीमेवरच्या अतिरेकी संघटनांचे सुरक्षादलांवरचे हल्ले वाढले आहेत. जून महिन्यात मणिपूरच्या ‘पिपल्स लिब्रेरशन आर्मी’ (पीएलए) या अतिरेकी संघटनेने आसाम रायफल्सच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले होते. मे महिन्यात म्यानमारच्या लष्कराने ईशान्य राज्यातल्या २२ अतिरेक्यांना भारताच्या स्वाधीन केले होते. यातील बरेचसे अतिरेकी वॉटेन्ड होते. आता नव्याने या अतिरेकी संघटना ईशान्य भारतात आणि भारत-म्यानमार सीमेवर सक्रीय झाल्या आहेत. कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे रोजगाराची समस्या भेडसावत आहे. या संधीचा फायदा घेऊन अतिरेकी संघटना युवकांना भरती करुन घेत आहेत.

सुरक्षादलाच्या हाती लागलेल्या माहितीनुसार भारत-म्यानमारच्या सीमेवर ‘एनएससीएन-के’ चे अतिरेकी एकत्र आले असून हे सुरक्षा दलांवर हल्ले चढविण्याचा कट रचत आहे. भारत-म्यानमारमधील ‘कलादान प्रोजेक्ट’ला याआधी लक्ष्य करण्याचा प्रयत्न अतिरेक्यांनी केला होता. पण भारत आणि म्यानमारच्या लष्कराने संयुक्तरीत्या ‘ऑपरेशन सनराईझ’ राबवून अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले होते. आता भारत आणि म्यानमारने हा प्रकल्प लवकरात लवकरात सुरू करण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. अशावेळी ईशान्य भारतात कार्यरत विविध अतिरेकी संघटनाचे अतिरेकी म्यानमारमध्ये एकत्र येत असल्याची बातमी आली आहे.

दरम्यान, या अतिरेकी संघटनांना चीन बळ पुरवत असल्याचे वारंवार समोर आले आहे. लडाखमध्ये भारत-चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या अतिरेकी संघटनांचे हल्ले वाढले आहेत. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात म्यानमारच्या लष्कराने मोठ्या प्रमाणावर चीनी बनावटीचा शस्त्रसाठा जप्त केला होता. चौकशीअंती चीनने हा सर्व शस्त्रसाठा तस्करी माध्यमातून भारतात कारवाया करण्यासाठी अतिरेकी संघटनांसाठी पाठविल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच ईशान्य भारताल्या बंडखोर संघटनांसाठी चिनी बनावटीचे शस्त्र उपल्बध असतात. तसेच काही दिवसांपूर्वी उल्फाचे भारतविरोधी केंद्र चीनमध्ये असल्याचे समोर आले होते.

leave a reply