‘डब्लूएचओ’ भारतात ‘ग्लोबल सेंटर ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन’ची स्थापना करणार

नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्लूएचओ) भारतात ग्लोबल सेंटर ऑफ ट्रेडिशनल मेडिसिनची स्थापना करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जाहीर केले. भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानाच्या हस्ते दोन राष्ट्रीय आयुर्वेद संस्थांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान बोलत होते.

'ग्लोबल सेंटर ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन'

पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त गुजरातमधील जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था (आयटीआरए) आणि जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (एनआयए) पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाने या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. ‘आयटीआरए’ जागतिक स्तरावरील आयुर्वेदिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून उदयास येईल. आयटीआरएमध्ये १२ वेगवेगळे विभाग असून, तीन वैद्यकीय प्रयोगशाळा आणि तीन संशोधन प्रयोगशाळा आहेत. या संस्थेच्या वतीने ३३ संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जामनगरमध्ये गुजरात आयुर्वेद विद्यापीठाच्या परिसरातल्या चार आयुर्वेद संस्थांना एकत्रित करून आयटीआरएची निर्मिती करण्यात आली आहे.

”कोरोनाच्या कालावधीत जगभर आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी वेगाने वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्यातीत सुमारे ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताच्या पारंपारिक औषध प्रणाली आणि आयुर्वेदाचे सामर्थ्य जगासमोर आले आहे. वैद्यकीय जगात आयुर्वेदाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे पंतप्रधांन म्हणाले. आयुर्वेद केवळ पर्याय नाही, तर तो देशाच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

भारतात ग्लोबल सेंटर ऑफ ट्रेडिशनल मेडिसिनची स्थापना करण्याची घोषणा ‘डब्लूएचओ’कडून करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस घेब्रेस्यूएस यांचा एक व्हिडिओ संदेश यावेळी दाखविण्यात आला. आयुर्वेद हा भारतीय वारसा आहे आणि भारताचे पारंपारिक ज्ञान इतर देशांनाही समृद्ध करीत आहे ही आनंदाची बाब आहे, असे डॉ घेब्रेस्यूएस यावेळी म्हणाले. ग्लोबल सेंटर ऑफ ट्रेडिशनल मेडिसिनसाठी भारताची निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेचे आभार मानले.

leave a reply