इस्रायलच्या गोलान टेकड्यांजवळ सिरियन लष्कराच्या कारवाया सुरू

दमास्कस – इस्रायलने गोलान टेकड्यांवरील आपला ताबा त्वरीत सोडून द्यावा, अशी मागणी सिरियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत केली. या मागणीला दोन दिवस उलटत नाही तोच, सिरियन लष्कराने गोलान टेकड्यांच्या सीमेजवळ कारवाई सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. सिरियन लष्कराबरोबर इराणसंलग्न दहशतवादी गट देखील गोलानच्या सीमेजवळ दाखल होत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे येत्या काळात गोलान टेकड्यांच्या सीमेजवळ इस्रायल आणि सिरियामध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता बळावली आहे.

गोलानगोलान टेकड्या स्वतंत्र करणे ही आपली प्राथमिकता असल्याची घोषणा सिरियाने दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर सिरियाने दक्षिण सीमेजवळील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या होत्या. गेल्या आठवड्याभरात सिरियन लष्कराने गोलानच्या सीमेजवळील तैनाती वाढविल्याच्या बातम्या समोर येत होत्या. दक्षिण सिरिया तसेच अल-कुनित्रा या भागात सिरियन लष्कराने मोठ्या प्रमाणात तैनाती वाढविली. ही तैनाती वाढवित असताना संयुक्त राष्ट्रसंघातील सिरियाचे राजदूत हुसामेद्दीन आला यांनी मानवाधिकार आयोगाच्या बैठकीत गोलान टेकड्यांचा प्रश्न उपस्थित केला होता.

इस्रायलने गोलान टेकड्यांच्या दक्षिण भागावर घेतलेला ताबा त्वरीत सोडून द्यावा, अशी मागणी राजदूत आला यांनी केली होती. इस्रायलने गोलान टेकड्यांवर बेकायदेशीररित्या ताबा मिळवून येथे आपले कायदे लागू केल्याची टीका आला यांनी केली होती. गोलावरील इस्रायलचा हा ताबा आणि येथील खनिज संपत्तीचे सुरू असलेले बेकायदेशीर उत्खनन सुरू करुन मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप सिरियन राजदूतांनी केला होता. त्याचबरोबर इस्रायलने गोलानमधून माघार घ्यावी, अशी मागणी आला यांनी केली होती. पुढच्या दोन दिवसात सिरियन लष्कराने गोलानच्या सीमेजवळ लष्करी कारवाया सुरू केल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे.

गोलान

त्याचबरोबर, येथील काही भागात सिरियन लष्कराबरोबर इराणसंलग्न दहशतावादी गटही दिसून आल्याची माहिती समोर येत आहे. गोलान टेकड्यांच्या सीमेजवळ इराणचे रिव्होल्युशनरी गार्डस किंवा हिजबुल्लाह आणि इराणसंलग्न दहशतवादी गटांची तैनाती अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचे इस्रायलने याआधी जाहीर केले होते. गोलानच्या सुरक्षेला आव्हान मिळाले तर त्यासाठी सिरियाला सर्वस्वी जबाबदार धरुन कारवाई करण्याचा इशारा इस्रायलने दिला होता. यासाठी इस्रायलने गोलान टेकड्यांमधील तैनातीही वाढविली होती.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल इस्माईल घनी यांनी सिरियाचा दौरा केला होता. या दौर्‍यात घनी यांनी सिरियन नेत्यांची भेट घेऊन इस्रायलवरील हल्ल्याबाबत चर्चा केल्याची बातमी समोर आली होती. घनी सिरियाच्या दौर्‍यावर असतानाच दमास्कसजवळच्या हवाई तळावर जोरदार हवाई हल्ले झाले होते. या हल्ल्यातून मेजर जनरल घनी थोडक्यात बचावले होते. इस्रायली लढाऊ विमानांनी हे हल्ले चढविल्याचे आरोप सिरियन माध्यमांनी केले होते. तर इस्रायली लष्कराने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.

leave a reply