साऊथ चायना सीमध्ये चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानने पाणबुडी तैनात केली

पाणबुडी तैनाततैपई/बीजिंग – चीनकडून तैवानवरील हल्ल्यासाठी आखण्यात येणार्‍या योजना व त्यासाठी सुरू असलेल्या आक्रमक कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर तैवानने ‘साऊथ चायना सी’मध्ये पाणबुडी तैनात केली आहे. तैवानच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही बाब उघड झाली. तैवानने आपली पाणबुडी ‘स्प्रार्टले आयलंड’नजिकच्या ‘तायपिंग आयलंड’जवळ तैनात केल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. ही बाब तैवान चिनी आक्रमणाच्या धोक्याविरोधात गांभीर्याने पावले उचलत असल्याचे दाखवून देते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनने आपल्या विस्तारवादी कारवायांची व्याप्ती वाढविली असून हॉंगकॉंगवरील पकड व साऊथ चायना सीमधील हालचाली त्याला दुजोरा देणार्‍या ठरतात. हॉंगकॉंगवर कायदा लादून पकड घट्ट करणार्‍या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आपले लक्ष आता तैवानवर केंद्रित केले आहे. काही आठवड्यांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उघडपणे तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित करून ते होणारच याची ग्वाही दिली.

पाणबुडी तैनातत्यानंतर चीनच्या संरक्षणदलांकडून युद्धाची पूर्वतयारी असणार्‍या हालचालींना वेग आला असून तैवाननजिकच्या सरावांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. चीनच्या प्रसारमाध्यमांनीही तैवान मुद्यावरून धमक्यांचे सत्र सुरू केले असून, सत्ताधारी राजवट कोणत्याही क्षणी निर्णायक पाऊल उचलेल, असे चित्र उभे केले आहे. याच पार्श्‍वभूमीवर तैवानने साऊथ चायना सी क्षेत्रात पाणबुडी रवाना करणे ही घटना लक्षवेधी ठरते.

तैवानच्या संरक्षणदलात सध्या फक्त दोन पाणबुड्या असून गेल्या वर्षभरात तैवानने स्वदेशी पाणबुड्यांच्या उभारणीस सुरुवात केली आहे. सध्या कार्यरत असलेल्या पाणबुड्यांपैकी हाय लुंग ही पाणबुडी तैवानने साऊथ चायना सीमधील तायपिंग बेटाजवळ तैनात केली होती. तायपिंग हे बेट ५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे असून व्हिएतनामजवळ असणार्‍या ‘स्प्रार्टले आयलंड’ क्षेत्राचा भाग आहे. तैवानच्या नौदलाने सरावासाठी या भागात पाणबुडी तैनात केली होती, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली. मात्र तैनातीचा नक्की कालावधी सांगण्यात आलेला नाही.

पाणबुडी तैनातचीनकडून तैवानवर हल्ला झाल्यास तैवानच्या मुख्य भूमीपासून दूर असणार्‍या क्षेत्रांना पहिले लक्ष्य केले जाईल, असे सांगण्यात येते. यात तायपिंग व डोंग्शा आयलंड या भागांचा समावेश आहे. त्यामुळे तैवानने या क्षेत्रांच्या सुरक्षेसाठी हालचाली सुरू केल्या असून पाणबुडी तैनातीसाठी पाठविणे त्याचाच भाग दिसत आहे. तैवान सरकार चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक निर्णय घेत असून संरक्षणसिद्धतेवर विशेष भर देण्यात आला आहे. लढाऊ विमाने, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे यांच्या सहाय्याने चीनला रोखण्याचे इरादे तैवानी अधिकारी तसेच विश्‍लेषकांकडून व्यक्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, तैवानच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणार्‍या इतर देशांनीही आपल्या हालचालींना वेग दिल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या दोन ‘बी-१ लान्सर बॉम्बर्स’नी नुकतीच ऑस्ट्रेलियाला भेट दिली. यावेळी ऑस्ट्रेलियन हवाईदलाबरोबर ‘रिफ्युएलिंग’ व इतर प्रकारचा सराव झाल्याची माहिती दोन्ही देशांकडून देण्यात आली.

leave a reply