कोरोनाचा फायदा उचलून परकीय शक्ती रशियातील निदर्शनांना प्रोत्साहन देत आहेत

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

परकीय शक्तीमॉस्को – कोरोनाच्या साथीमुळे रशियन जनतेत निर्माण झालेले वैफल्य व नाराजीचा फायदा उचलून परदेशी शक्ती रशियातील निदर्शनांना खतपाणी घालीत आहेत, असा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. रशियात सध्या पुतिन यांचे विरोधक अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व युरोपिय देशांनी रशियावर दडपण आणण्यास सुरुवात केली असून निर्बंधांचाही इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना पुतिन यांनी रशियातील निदर्शनांसाठी परदेशी शक्तीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अ‍ॅलेक्सी नॅव्हल्नी यांच्यावर प्राणघातक विषप्रयोग झाला होता. पुतिन यांचे कडवे विरोधक मानल्या जाणार्‍या नॅव्हॅल्नी यांच्यावरील या विषप्रयोगासाठी रशियन सरकार जबाबदार असल्याचा आरोप झाला होता. गेल्या महिन्यात नॅव्हॅल्नी रशियात माघारी आल्यानंतर त्यांना तातडीने अटक करून तुरुंगात धाडण्यात आले होते. यामुळे रशियातील परकीय शक्तीनॅव्हॅल्नी यांचे समर्थक आणि पुतिन विरोधकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू केली आहेत. या निदर्शकांवर रशियन सुरक्षा यंत्रणेने आत्तापर्यंत केलेल्या कारवाईत हजारोजणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तरुणवर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी एका मुलाखतीदरम्यान, अमेरिका व युरोपकडून टाकण्यात येणार्‍या संभाव्य निर्बंधांवरून कठोर इशारा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी निदर्शनांमागे थेट परकीय शक्तींचा हात असल्याचा उल्लेख करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

कोरोनाच्या साथीमुळे जगातील सर्व प्रमुख देशांना मंदीचा फटका बसला असून रशियाही त्याला अपवाद नाही. कोरोनामुळे जनतेचे जीवनमान घसरले असून लोक असमाधानी व चिडचिडी बनले आहेत. अशा स्थितीत देशातील सगळ्या चुकांचे खापर सरकारवर फुटणे यात चुकीचे काहीच नाही. मात्र रशियाच्या विरोधकांनी जनतेतील या नाराजीचा वापर रशियन राजवटीविरोधातील भावना भडकविण्यासाठी केला’, असा आरोप राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला.

‘नॅव्हॅल्नी यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी व सत्तेसाठी हपापलेल्या लोकांना खास तयार केले गेले आहे. रशियाची ताकद क्षीण करण्यासाठी व त्यावर ताबा मिळविण्यासाठी परदेशी शक्ती त्यांचा वापर करीत आहेत. रशियाला अनेक क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळाले आहे आणि हे यश परदेशी राजवटींना खुपते आहे. त्यामुळेच रशियाला नियंत्रणात ठेवण्याचे धोरण आखण्यात आले आहे. रशियन अर्थव्यवस्थेविरोधात घेण्यात येणार्‍या निर्णयांचाही त्यात समावेश आहे’, या शब्दात पुतिन यांनी अमेरिका व युरोपिय देशांना धारेवर धरले.

गेल्याच महिन्यात, डॅव्होस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी परदेशी शक्तींना इशारा दिला होता. व्यापारी अडथळे तसेच आर्थिक व तंत्रज्ञानविषयक निर्बंध लष्करी कारवाईला आमंत्रण देऊ शकतात व ही लष्करी कारवाई सर्वांसाठीच घातक बाब ठरेल, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले होते. यावेळी रशियन राष्ट्राध्यक्षांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपन्यांवरही जोरदार टीकास्त्र सोडले होते.

leave a reply