‘ऑकस डील’वरून फ्रान्स व इतर देशांमधील तणाव कायम

पॅरिस/वॉशिंग्टन/कॅनबेरा – ‘ऑकस डील’मुळे फ्रान्स व अमेरिकेत तयार झालेले राजनैतिक संकट निवळायला वेळ लागेल आणि त्यासाठी अमेरिकेने पावले उचलणे गरजेचे आहे, असे फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन य्वेस-द्रिआन यांनी बजावले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी ही स्पष्ट भूमिका मांडली. गेल्याच आठवड्यात फ्रान्सने या कराराच्या मुद्यावरून अमेरिका व ऑस्ट्रेलियामधील आपले राजदूत माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अमेरिका व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांनी फ्रान्सबरोबरील तणाव कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

‘ऑकस डील’वरून फ्रान्स व इतर देशांमधील तणाव कायमगेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने अमेरिका व ब्रिटनबरोबर आण्विक पाणबुड्यांसह इतर संरक्षणविषयक सहकार्याचा समावेश असलेला करार केला होता. हा करार होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची फ्रान्सबरोबर पाणबुड्यांच्या कराराबाबत बोलणी सुरू होती. ऑस्ट्रेलियाने फ्रेंच कंपनीशीही संपर्क साधला होता. या पार्श्‍वभूमीवर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अथवा ब्रिटन यापैकी कोणत्याही देशाने फ्रान्सशी संवाद न साधता करार केल्याने फ्रान्स चांगलाच दुखावला गेल्याचे समोर येत आहे.

फ्रान्सची नाराजी दूर करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांनी राजनैतिक हालचाली सुरू केल्या आहेत. बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना फोन केला होता. यावेळी दोन्ही नेत्यांनी नाटो सहकारी देशांमधील विश्‍वासार्हता टिकविण्यासाठी सखोल वाटाघाटी सुरू करण्यास मान्यता दिली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढील महिन्यात फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेटही घेणार असल्याचे संकेत सूत्रांकडून देण्यात आले आहेत.

‘ऑकस डील’वरून फ्रान्स व इतर देशांमधील तणाव कायमया पार्श्‍वभूमीवर फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी, अमेरिकेच्या मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत घेतलेली भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरते. फ्रेंच परराष्ट्रमंत्री जीन य्वेस-द्रिआन व अमेरिकेचे ब्लिंकन यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाली. यावेळी य्वेस-द्रिआन यांनी, ‘ऑकस डील’मुळे फ्रान्स व अमेरिकेदरम्यान असलेल्या विश्‍वासार्हतेला धक्का बसला असून ही मोठी समस्या असल्याचे स्पष्ट शब्दात बजावले. तसेच ही समस्या झटकन सुटणारी नसून त्यासाठी वेळ जाईल, असेही नमूद केले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनीही फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांच्या भूमिकेला दुजोरा दिला असून, काही वेळ जाईल, अशी कबुली दिली आहे.

अमेरिकेबरोबर चर्चा करणार्‍या फ्रान्सने ब्रिटन व ऑस्ट्रेलियाच्या प्रयत्नांना मात्र थंड प्रतिसाद दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी, आपण फ्रेंच राष्ट्राध्यक्षांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला. मात्र फ्रान्सकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे मॉरिसन यांनी सांगितले. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांच्याशी बोलणी करण्यासही फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी नाकारल्याचे वृत्त समोर आले आहे. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन य्वेस-द्रिआन यांनी ब्रिटन संधीसाधू असल्याचे टीकास्त्रही सोडले आहे.

दरम्यान, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया कराराचा भाग असणार्‍या ‘नॅव्हल ग्रुप’ या कंपनीने ऑस्ट्रेलियाकडून नुकसानभरपाई मागण्याची घोषणा केली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला बिल पाठविण्यात येईल, असे कंपनीचे प्रमुख पिएरे पॉमलेट यांनी फ्रेंच दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

leave a reply