अंदमान-निकोबार बेटावरुन ‘ब्रह्मोस’ची चाचणी

नवी दिल्ली – गेल्या तीन महिन्यांमध्ये क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका लावून शत्रूला इशारे देणाऱ्या भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) मंगळवारी ‘ब्रह्मोस’च्या लष्करी आवृत्तीची चाचणी घेतली. अंदमान-निकोबार बेटावर भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ही चाचणी पार पडली. येत्या काही दिवसात अंदमान-निकोबार बेटावरुनच या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नौदल व वायुसेनेच्या आवृत्तीची देखील चाचणी होणार आहे.

चाचणी

जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे याआधीच भारतीय लष्कराच्या सेवेत कार्यरत आहेत. सध्या लडाख तसेच अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ही क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. असे असले तरी अंदमान-निकोबार बेटावरुन या क्षेपणास्त्राच्या लष्करी आवृत्तीची घेतलेली चाचणी अतिशय महत्त्वाची ठरत असल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजता अंदमान-निकोबार द्वीपसमुहांवरील एका बेटावर तैनात मोबाईल लाँचरवरुन ब्रह्मोस प्रक्षेपित करण्यात आले.

90 अंश कोनात आपली दिशा बदलणाऱ्या या क्षेपणास्त्राने याच द्वीपसमुहाच्या दुसऱ्या बेटावरील आपले लक्ष्य अचूकरित्या भेदले. ‘डीआरडीओ’ तसेच भारतीय लष्कराने या क्षेपणास्त्राने किती अंतरावरील लक्ष्य भेदले, याचे तपशील उघड केलेले नाही. या चाचणीबरोबर शत्रूचे हवाईतळ, लष्करी मुख्यालय, महामार्ग, महत्वाची ठिकाणे सहज लक्ष्य करता येऊ शकतात. अशा हल्ल्यासाठी आता शत्रूच्या हद्दीजवळ लढाऊ विमाने रवाना करण्याची आवश्‍यकता उरणार नाही.

याआधी 30 सप्टेंबर रोजी डीआरडीओ तसेच भारतीय लष्कराने 400 किलोमीटर पर्यंतचे लक्ष्य भेदणाऱ्या ब्रह्मोसच्या चाचणीने खळबळ माजविली होती. जगातील सर्वात वेगवान व तैनात असलेले क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळख असलेल्या ‘ब्रह्मोस’ला भेदणे अवघड असल्याचा दावा केला जातो. भविष्यात ब्रह्मोसची मारक क्षमता 1500 किलोमीटर पर्यंत वाढविली जाणार असल्याचे बोलले जाते.

leave a reply