हुकूमशाहीवादी देशांकडून भारत व ब्रिटनला धोका

- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

नवी दिल्ली/लंडन – हुकूमशाहीवादी देशांकडून भारत व ब्रिटनसारख्या लोकशाहीवादी देशांना धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीवादी देशांची एकजूट अत्यंत महत्त्वाची ठरते, असे सांगून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आपल्या भारत भेटीचे महत्त्व अधोरेखित केले. २१ एप्रिल रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारतात येणार असून अहमदाबादपासून ते आपला दौरा सुरू करणार आहेत. या दौर्‍याच्या आधी हुकूमशाहीवादी देशांकडून असलेल्या धोक्याचा पंतप्रधान जॉन्सन यांनी केलेला उल्लेख एकाच वेळी रशिया व चीनकडे बोट दाखविणारा ठरतो.

हुकूमशाहीवादी देशांकडूनकाही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस भारताच्या भेटीवर आल्या होत्या. या दरम्यान अमेरिकेचे उपसुरक्षा सल्लागार दलिप सिंग देखील भारतात आले होते. भारत रशियाकडून खरेदी करीत असलेल्या इंधनाच्या विरोधात इशारा देण्यासाठी अमेरिका व ब्रिटनने दलिप सिंग व लिझ ट्रूस यांना भारतात धाडल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र लिझ ट्रूस यांनी भारताला इंधनव्यवहारावर सल्ले देण्यासाठी मी या दौर्‍यावर आलेली नाही, असा खुलासा केला होता. त्याचवेळी ब्रिटन भारताबरोबर मुक्त व्यापारी करारासाठी अतिशय उत्सूक असल्याचे परराष्ट्रमंत्री ट्रूस यांनी लक्षात आणून दिले.

भारताने ऑस्ट्रेलियासोबत मुक्त व्यापारी करार केला असून इतर देश देखील भारताशी असा करार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. ब्रिटननेही यासंदर्भात भारताशी चर्चा सुरू केली असून या चर्चेच्या प्रगतीवर दोन्ही देश समाधान व्यक्त करीत आहेत. पंतप्रधान जॉन्सन यांच्या या दौर्‍यात ते पंतप्रधान मोदी यांच्याशी व्यापारी सहकार्यावर महत्त्वपूर्ण चर्चा करतील, अशी माहिती दिली जाते. तसेच दोन्ही देशांमधील आर्थिक, संरक्षणविषयक धोरणात्मक भागीदारीवर चर्चा संपन्न होईल, असे सांगितले जाते.

आपला हा भारत दौरा दोन्ही देशांमधील रोजगारनिर्मिती, आर्थिक विकास, ऊर्जासुरक्षा आणि संरक्षणाच्या आघाडीवर फलदायी ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान जॉन्सन यांनी व्यक्त केला. त्याचवेळी भारत व ब्रिटन या लोकशाहीवादी देशांच्या शांती व समृद्धीला हुकूमशाही व्यवस्था असलेल्या देशांकडून धोका संभवतो, असे सूचक उद्गार पंतप्रधान जॉन्सन यांनी काढले आहेत. रशिया हा ब्रिटनच्या सुरक्षेला संभवणारा सर्वात मोठा धोका असल्याचे या देशाचे म्हणणे आहे. युक्रेनच्या युद्धामुळे रशियापासून असलेला हा धोका अधिकच वाढल्याचे दावे ब्रिटनकडून केला जातो. त्याचवेळी कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही असलेल्या चीनच्या कारवायांचे आव्हान भारताच्या सुरक्षेसमोर आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी चीनपासून भारताला व रशियापासून ब्रिटनला संभवणार्‍या धोक्याचा मुद्दा एकत्र केल्याचे दिसते. मात्र कुठल्याही परिस्थितीत भारत रशियाबरोबरील सहकार्याशी तडजोड करणार नाही, हे भारत अमेरिकेसह सर्वच पाश्‍चिमात्य देशांना वारंवार बजावत आहे.
भारत फार मोठी आर्थिक क्षमता असलेला देश असून जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. यामुळे आजच्या अनिश्‍चिततेच्या काळात ब्रिटन भारताबरोबरील आपल्या धोरणात्मक सहकार्याला विशेष महत्त्व देत असल्याचे पंतप्रधान जॉन्सन पुढे म्हणाले.

leave a reply