हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोघांची भारताकडून हकालपट्टी

नवी दिल्ली –  भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या दोन जणांची भारताने हकालपट्टी करण्यात आली आहे.  हे दोघे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय‘ला भारतीय लष्कराबाबतची संवेदनशील माहिती पुरवित होते. 

Spy from Pakistan High Commissionहकालपट्टी करण्यात आलेले अबिद हुसेन आणि मोहम्मद ताहीर खान हे दोघेजण पाकिस्तानच्या उच्चायुक्तामध्ये व्हिसा विभागात कार्यरत होते. अबीद पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तर मोहम्मद ताहीर खान इस्लामाबादमधील रहिवासी आहेत. मात्र या दोघांकडे भारतीय नावांची बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रे होती. त्या आधारावर भारतातून त्यांनी सिमकार्ड खरेदी केली होती. बनावट नावाने हे दोघे संवेदनशील ठिकांणाना भेट द्यायचे.  तसेच सोशल मीडियाद्वारे संपर्क प्रस्थापित करून सुरक्षादलांच्या कर्मचाऱ्यांना फूस लावून संवेदनशील माहिती काढून घ्यायचे. 

लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला या दोघांचा संशय आला होता, त्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. रविवारी दिल्ली पोलिसांनी त्यांना करोल बागजवळील आर्मी युनिटजवळ रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून संवेदनशील कागदपत्रे आणि १५ हजार रोख रक्कम आणि दोन आयफोन्स जप्त करण्यात आले. चौकशीतच ते  ‘आयएसआय’साठी काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दोघांपासून भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे आरोप ठेवून परराष्ट्रमंत्रालयाने त्यांना चोवीस तासात देश सोडण्याचे आदेश दिले. पाकिस्तानने याचा निषेध केला असून हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. ही भारताची पाकिस्तान विरोधी मोहीम आहे.  या माध्यमातून भारत जम्मू आणि काश्मीरमधल्या मानवाधिकारांच्या हननाकडून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा कांगावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.     

दरम्यान, पाकिस्तान आपल्या दूतावासांचा वापर हेरगिरी आणि भारतविरोधी कारवायांसाठी करीत असल्याचे यापूर्वीही उघड झाले होते. २०१६ साली दिल्लीमधल्या पाकिस्तानी उच्चायुक्तातील १६ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. बांगलादेशातही पाकिस्तानच्या उच्यक्तालयातून हेरगिरी, तसेच भारत आणि बांगलादेशविरोधी कारवाया सुरु असल्याचे उघड झाले होते. पाच वर्षांपूर्वी श्रीलंकेतील पाकिस्तानी दूतावासातूनही अशाच कारवाया सुरु असल्याचे उघड झाले होते. यावरून भारताच्या आरोपानंतर हेरगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याला माघारी बोलाविण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली होती. 

leave a reply