रशियन इंधनाच्या दरांवर मर्यादा घातल्यास गंभीर परिणाम होतील

राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

Russia flag मॉस्को – रशियन इंधनाच्या दरांवर मर्यादा घालण्याचे प्रयत्न केल्यास आंतरराष्ट्रीय इंधन बाजारपेठेवर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. जी७ व युरोपिय महासंघाकडून रशियाकडून निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरांवर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. पाश्चिमात्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन तेलाचा दर प्रति बॅरल ६५ ते ७० डॉलर्स या स्तरावर ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियन अर्थव्यवस्था व इंधनक्षेत्र खिळखिळे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले. त्याचा काही अंशी फटका रशियाला बसला असला तरी इंधनक्षेत्र व अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळालेले नाही. अमेरिका, ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांनी रशियन इंधनाची थेट आयात बंद केली आहे. मात्र यातील अनेक देश वेगवेगळ्या मार्गाने रशियन इंधनाची खरेदी करीत असल्याचे वारंवार समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर रशियन इंधनाचे दर पाडण्याचा प्रयत्न लक्ष वेधून घेणारा ठरतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८५ डॉलर्सच्या वर आहेत. युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रशियाने आपल्या कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सवलत देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे रशियाचे ‘उरल क्रूड’ सध्या ६० ते ६५ डॉलर्स प्रति दराने बाजारपेठेत उपलब्ध आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक देशांनी याची खरेदी चालू ठेवली आहे. त्यामुळे अजूनही रशियाला इंधनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे.

पाश्चिमात्य देशांचे रशियाला मिळणाऱ्या या उत्पन्नावर घाव घालण्याचे इरादे असून त्यासाठीच त्यांनी रशियन तेलाचे दर पाडण्याची तयारी केली आहे. मात्र पाश्चिमात्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरणार नाहीत. उलट त्याचे गंभीर परिणाम जागतिक इंधन बाजारपेठेवर होतील, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला. जे देश इंधनदरांवरील मर्यादेची अंमलबजावणी करतील त्यांना रशिया तेल पुरविणार नाही, असेही पुतिन यांनी बजावले. इंधन उत्पादक देशांची आघाडीची संघटना असणाऱ्या ओपेकनेही रशियन इंधनदरावर निर्बंध आणण्याच्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काही विश्लेषकांनी रशिया इंधनबाजारपेठेतील आपली निर्यात मोठ्या प्रमाणात घटवू शकतो व त्यामुळे कच्च्या तेलाचे दर पुन्हा प्रचंड उसळी घेतील, अशी भीती व्यक्त केली आहे.

leave a reply