मध्य अमेरिकेतील देशांमधील हजारो निर्वासितांचा तांडा अमेरिकेच्या दिशेने

अमेरिकेच्या दिशेनेमेक्सिको सिटी/वॉशिंग्टन – मध्य अमेरिकेतील होंडुरास व एल साल्वादोर या देशांमधील दोन हजारांहून अधिक निर्वासित अमेरिकेच्या दिशेने निघाल्याचे समोर आले आहे. निर्वासितांचा हा तांडा सध्या मेक्सिकोत असून त्यातील एका गटाची मेक्सिकन सुरक्षायंत्रणांबरोबर चकमक उडाल्याचेही समोर आले आहे. गेल्याच महिन्यात हैतीतील हजारो निर्वासित अमेरिकेत घुसल्याचे उघड झाले होते. त्यापाठोपाठ येणार्‍या या नव्या तांड्यामुळे अमेरिकेतील ‘बॉर्डर क्रायसिस’ अधिकच तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत आलेल्या तसेच घुसखोरी करणार्‍या निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मेक्सिको सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी ‘मेक्सिको वॉल’च्या उभारणीबरोबरच ‘रिमेन इन मेक्सिको’सारखे धोरणही राबविले होते. त्यात मेक्सिकोतून अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांची प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना मेक्सिकोतच ठेवण्याच्या तरतुदीचा समावेश होता.

मेक्सिकोतून येणार्‍या निर्वासितांच्या तांड्यांना रोखण्यासाठी आणीबाणी घोषित करून लष्कर तैनात करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. या आक्रमक भूमिकेमुळे मेक्सिको व इतर देशांना सुरक्षायंत्रणा तैनात करून निर्वासितांचे तांडे रोखणे भाग पडले होते. माजी राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी मेक्सिकोसह मध्य अमेरिकी देशांबरोबर करारही केले होते. ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती.

मात्र ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसातच ‘रिमेन इन मेक्सिको’ रद्द करून अवैध निर्वासितांसाठी अमेरिकेच्या सीमा खुल्या केल्या होत्या. त्यामुळे एकापाठोपाठ एक निर्वासितांचे तांडे अमेरिकेच्या दिशेने निघत असल्याचे समोर येत आहे. सध्या मेक्सिकोतून प्रवास करणारा निर्वासितांचा तांडा बायडेन यांच्या कारकिर्दीतील चौथा तांडा आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यात मध्य अमेरिकेतून निघालेल्या तांड्याला ग्वाटेमालातच रोखण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यातील तांडा मेक्सिकोच्या सैन्याने रोखून धरला होता. तर गेल्या महिन्यातील ८०० निर्वासितांवर मेक्सिकोच्या सीमा सुरक्षा यंत्रणेने कारवाई केली होती. या कारवायांनंतरही दोन हजारांहून अधिक निर्वासितांचा नवा तांडा अमेरिकेच्या दिशेने निघाल्याचे समोर येत आहे. या तांड्याला रोखण्याचे मेक्सिकन यंत्रणांचे प्रयत्न फसले असून निर्वासित मेक्सिको सिटीनजिक पोहोचल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेच्या दिशेनेनिर्वासितांच्या एकामागोमाग निघणार्‍या तांड्यामागे अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाचे धोरण कारणीभूत असल्याचे मानले जाते. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेच्या सीमा सुरक्षित ठेवण्याकडे दुर्लक्ष केले असून संबंधित यंत्रणांना अतिरिक्त निधी व इतर सुविधा पुरविलेल्या नाहीत. त्यामुळे निर्वासितांना अमेरिकेच्या सीमा मोकळ्या झाल्या असून गेल्या काही महिन्यात हजारो निर्वासित अमेरिकेत घुसले आहेत. अमेरिकेतील ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यात अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने सुमारे दीड लाखांहून अधिक अवैध निर्वासितांना देशात मोकळे सोडून दिल्याचे उघड झाले आहे.

बायडेन प्रशासनाच्या धोरणांमुळे अमेरिकेत ‘बॉर्डर क्रायसिस’ तयार झाल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही बायडेन यांच्यावर घणाघाती टीका केली. सीमेतून घुसणार्‍या अवैध निर्वासितांमुळे अमेरिकेत विष पसरत असल्याचे टीकास्त्र ट्रम्प यांनी सोडले आहे. अमेरिका मृत्यूपंथाला लागली असून, कुणीही देश वाचविण्यासाठी पुढाकार घेत नाही, असा गंभीर आरोप माजी राष्ट्राध्यक्षांनी केला.

leave a reply