चीनबाबत चर्चेसाठी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार युरोप दौऱ्यावर

वॉशिंग्टन – कोरोना व हॉंगकॉंगसारख्या मुद्द्यावरून चीन आणि पाश्चात्त्य देशांमधील संबंध ताणलेले असतानाच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन सोमवारी युरोप दौऱ्यावर दाखल होत आहेत. ओब्रायन यांच्याबरोबर अमेरिकेचे राष्ट्रीय उपसल्लागार मॅथ्यू पॉटिंगर तसेच नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही युरोप दौऱ्यात समावेश आहे. कोरोनाच्या साथीनंतर अमेरिका व चीनदरम्यान तीव्र राजनैतिक संघर्ष सुरू असून युरोपीय देशांनीही चीनला धारेवर धरले आहे. या पार्श्‍वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जातो.

USA-Europe-Visitअमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रोबर्ट ओब्रायन सोमवारी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल होत आहेत. सोमवारी ते फ्रान्सच्या वरिष्ठ नेत्यांची तसेच अधिकाऱ्यांची भेट घेणार असून द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील. त्यानंतर मंगळवारी व बुधवारी ओब्रायन यांच्यासह अमेरिकी शिष्टमंडळ ब्रिटन, जर्मनी तसेच इटलीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. या सर्व बैठका पॅरिसमध्ये होतील अशी माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली आहे.

चीनबरोबरील संबंधांच्या मुद्द्यावर अमेरिका व युरोपमध्ये मतभेद असून यापूर्वी ते वारंवार समोर आले होते. मात्र कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली असून युरोपातही चीनविरोधातील असंतोष तीव्र होत आहे. कोरोनाच्या साथीची चीनच्या सत्ताधारी राजवटीने केलेली हाताळणी आणि त्याचवेळी हॉंगकॉंग तसेच उघुरवंशीयांबाबत घेतलेले निर्णय युरोपमधील नाराजीचे प्रमुख कारण ठरले आहे. चीनबरोबरील संबंधांच्या मुद्द्यावर युरोपीय महासंघाने दिलेले इशारे तसेच आवाहनही चीनने धुडकावून लावल्याचे दिसून आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने कोरोनाची साथ, हॉंगकॉंग तसेच ५जी तंत्रज्ञान यासारख्या मुद्द्यांवर चीनविरोधात जागतिक आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा युरोप दौरा त्याचाच भाग दिसत आहे.

leave a reply